Mon, Aug 19, 2019 11:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंगणवाडी सेविकांचा मेस्मा काढण्यास नकार

अंगणवाडी सेविकांचा मेस्मा काढण्यास नकार

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी 

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. कुपोषण निमूर्र्लनाचा दृष्टिकोन ठेवूनच अंगणवाडी कर्मचार्‍यांना मेस्मा कायदा लावण्यात आला असून तो मागे घेतला जाणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत स्पष्ट  केले. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत अंगणवाडी कर्मचार्‍यांवरील जुलमी कारवाईचा धिक्कार केला.

गर्भवती महिला, कुपोषित बालके यांना तुटपुंज्या मानधनात वाड्या-वस्त्यावर जाऊन पोषण आहार देण्याचे काम करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांंना मेस्मा लावायचाच असेल तर सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे त्यांना वेतन द्या, अन्यथा मेस्मा कायदा रद्द करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये, हेमंत टकले, विद्या चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे अनिल परब यांनीदेखील मेस्माची कारवाई अन्यायकारक असून ती मागे घेण्याची मागणी केली.

अंगणवाडीत येणारी बालके, गरोदर मातांना वेळच्या वेळी पोषण आहार मिळावा, त्यांचे कुपोषण होऊ नये या उद्देशानेच विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन त्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्या (मेस्मा) लागू करण्यात आला आहे. अंगणवाडीत येणार्‍या मुलांना आठ-आठ दिवस पोषण आहार दिला जात नसेल. त्यांना उपाशी ठेवले जात असेल तर कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढेल यासाठी हा कायद्या लावण्यात आला आहे. कर्मचार्‍यांचे जे काही प्रश्‍न असतील, मागण्या असतील त्यावर सरकार निश्‍चितच सकारात्मक भूमिका घेत असून यापुढेही घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.