Sat, Feb 23, 2019 16:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरी पूल कुणाचा? पालिका-रेल्वेत जुंपली

अंधेरी पूल कुणाचा? पालिका-रेल्वेत जुंपली

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 1:50AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरी रेल्वे स्टेशनजवळचा दुर्घटनाग्रस्त पूल नेमका कोणाचा, यावरून मुंबई महापालिका व पश्‍चिम रेल्वे प्रशासनात चांगलीच जुंपली आहे. हा पूल पालिकेचा असल्याचे सांगून रेल्वेने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. तर पूल रेल्वेच्या अखत्यारित असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यात शिवसेनेने हा पूल रेल्वेचा असल्याचे सांगत भाजपाला टार्गेट केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून हा पूल पालिकेच्या अखत्यारित असल्याचे सांगत, भाजपाने संपूर्ण जबाबदारी शिवसेनेवर ढकलली आहे. 

पश्‍चिम व मध्य रेल्वे मार्गाला ओलांडून जाणार्‍या पादचारी व वाहनांच्या पुलांची जबाबदारी रेल्वेसह त्या त्या भागातील महापालिकेची असते. पण रेल्वे स्टेशनमधील सर्व पादचारी पुलाची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेचीच असते. अंधेरीचा दुर्घटनाग्रस्त पादचारी पूल हा मुंबई महापालिका व रेल्वेच्या अखत्यारित येतो. म्हणून पुलाच्या डागडुजीची जबाबदारी पालिका व रेल्वे या दोघांची आहे. पण हा पूल रेल्वे हद्दीत कोसळल्यामुळे पालिकेने दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी रेल्वेवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे हद्दीतील पुलाच्या कामाला पालिका निधी देत असली तरी, त्या पुलाच्या डागडुजीची जबाबदारी रेल्वेची असल्याचे पालिकेच्या पूल विभागाचे म्हणणे आहे. तर रेल्वे प्रशासनानेही ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. अंधेरीचा कोसळलेला पूल हा मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येतो. तरीही या दुर्घटनेची चौकशी रेल्वे सेप्टी आयुक्त करतील, असे पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. 

या वादात शिवसेना-भाजपाने उडी घेतली आहे. गोखले पुलाची जबाबदारी रेल्वेची असल्याचे मत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केले. या पुलाच्या डागडुजीसाठी पालिकेने रेल्वेला निधी दिला आहे. त्यामुळे डागडुजीची जबाबदारी पालिकेची नव्हती, असा दावाही महापौरांनी केला आहे. तर दुसरीकडे हा पूल पालिकेचा असल्याचा दावा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, चौकशी झाल्यानंतर नेमका पूल कोणाचा हे सत्य उघड होणार आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलून मुंबईकरांच्या जीवाशी खेळू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.