Thu, Jun 27, 2019 00:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेत सेना-भाजपचे पारडे जड; काँग्रेसची वाताहत 

विधान परिषदेत सेना-भाजपचे पारडे जड; काँग्रेसची वाताहत 

Published On: May 25 2018 7:55AM | Last Updated: May 25 2018 7:55AMमुंबई : उदय तानपाठक

गेले अनेक दिवस वाजत-गाजत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य मतदारांनी शिवसेना आणि भाजप यांना प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादीला एका जागेवर कौल दिला आणि काँग्रेेसला मात्र पूर्णपणे हार पत्करावी लागली. या निवडणुकीत मतदारांना प्रचंड प्रमाणात लक्ष्मीदर्शन घडवण्यात आले, तसेच स्थानिक पातळीवर एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकारही झाले.

कर्नाटकच्या निमित्ताने देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी बनवण्याच्या खटाटोपात असलेल्या काँग्रेेसला एकाही जागेवर विजय मिळू न शकणे हे जिव्हारी लागणारे आहे. शिवसेनेने मारलेली दोन जागांवरची मुसंडी स्वबळावर लढण्याच्या स्वप्नाला ताकद देणारी असली, तरी कोकणातला पराभव मात्र काळजीत पाडणारा आहे. 

या निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांनी आपापले हिशेब चुकते केले आहेत, तर काही ठिकाणी आगामी काळात राजकारणाच्या पटावर नवा डाव मांडला जाईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. एकमेकांवर अत्यंत कडवट भाषेत गरळ ओकणार्‍या भाजप आणि शिवसेनेत या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची चाचणी घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवारच दिले नव्हते. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीला मदत करण्याची छुपी भूमिका घेतली होती. तसे निरोपदेखील आपल्या मतदारांना भाजपच्या नेत्यांनी दिले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी निवडणुकीच्या आदल्याच दिवशी आपल्याला भाजपकडून मेसेज मिळाला असल्याचे जाहीरदेखील केले होते. भाजपची ही चाल पाहून शिवसेनेनेदेखील रणनीती तयार केली. नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांनाच सेनानेत्यांनी साकडे घातले. खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे भुजबळांच्या संपर्कात होतेच. भुजबळांनीही आपले वजन अखेरच्या क्षणी शिवसेनेच्या पदरात टाकून जुने ऋणानुबंध ताजे केले आणि भाजपच्या रणनीतीचा पराभव झाला. नाशिकमध्ये विजयासाठी 400 मतांची आवश्यकता असताना शिवसेनेकडे अवघी 211 मते होती. त्यात सगळेच पक्ष विरोधात उभे राहिले होते. असे असतानाही सेनेचा उमेदवार विजयी झाला, याला महत्त्व आहे. नव्या इनिंगच्या तयारीत असलेल्या भुजबळांनी राष्ट्रवादीला हा पहिला धक्‍का दिल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. सेनेच्या नरेंद्र दराडे यांनीही आपल्या विजयात भुजबळ यांचाही सहभाग असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले आहे. याशिवाय सतत बाहेरच्या माणसांना आणून आपल्या डोक्यावर बसवण्याच्या भाजपच्या धोरणामुळे त्या पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदत असून, या निवडणुकीत पक्षाचा छुपा आदेश भाजपच्याच काहींनी झिडकारल्याची शक्यता आहे. आम्ही आमच्या मतदारांना सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावयास सांगितले होते. मात्र, याचा अर्थ शिवसेनेच्या विरोधात मते द्या असा नव्हता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले, तरी ती पश्‍चातबुद्धीच आहे.    

रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे रिंगणात होते. तटकरेंनी आपल्या कुटुंबातील चौथा सदस्य विधानभवनात आणला आहे. त्यांचे भाऊ, पुतण्या ते स्वतः आणि आता त्यांचा मुलगा विधानभवनात आला, असा योग फार कमी वेळा पहायला मिळतो. तटकरे यांनी अनिकेतसाठी शेकापसोबतचे जुने वैर मिटवले, भाजपसोबत सेटिंग केली, नारायण राणे यांच्याशी हातमिळवणी केली. काँग्रेस, शेकाप आणि नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षानेही तटकरे यांच्या मुलाला पाठिंबा जाहीर केल्याने अनिकेत शिवसेनेच्या राजीव साबळे यांना धूळ चारत विजयी झाले. 

नाशिक असो वा रायगड, दोन्ही ठिकाणी पालघरचा वचपा काढण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीशी छुपी युती करून शिवसेनेला जागा दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र रायगडात यश आणि नाशिकात मात्र भाजपला त्यात अपयश आले.  

परभणी- हिंगोलीमध्ये शिवसेनेने विप्लव बाजोरियांना रिंगणात उतरवले होते. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. परभणी- हिंगोलीत 501 मतदारांपैकी विप्लव बाजोरिया यांना 256, तर सुरेश देशमुख यांना 221 मते मिळाली.

चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील 1059 मतदार होते. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असली, तरी नगरसेवकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळेच भाजपने  मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार, खासदारांपर्यंत सर्वांनाच कामाला लावले होते. अखेरच्या टप्प्यात तर ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी सूत्रे हाती घेतली आणि रामदास आंबटकर यांचा विजय निश्‍चित झाला. त्यांना 528, तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना 491 मते मिळाली. 36 मते बाद आणि एका मतदाराने नोटाचा वापर केला. 

...म्हणून प्रवीण पोटे यांचे पारडे जड
अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे  भाजपने बाजी मारली असली, तरी अमरावतीमध्ये काँग्रेसच्या मतदारांची फुटलेली मते त्या पक्षाला चिंता करायला लावणारी आहेत. काँग्रेसकडे 128 मते होती. मात्र, त्यापैकी अवघ्या 17 मतदारांनी स्वपक्षाच्या उमेदवारास मते दिली. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी पोटे यांनाच पाठिंबा दिल्याने भाजपचे प्रवीण पोटे यांचे पारडे आधीच जड झाले होते. त्यांनी 458 मते मिळवून आपली विधान परिषदेतील आणि मंत्रिमंडळातील जागा पक्‍की केली.

Tags : blog, Eelection, vidhan Parishad, Election, Result, BJP, Shivsena, Congress, NCP