Fri, Jan 18, 2019 07:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एफआरपीसाठी ५ टक्के वाढीव मूल्यांकन रक्‍कम देण्याचा प्रयत्न

एफआरपीसाठी ५ टक्के वाढीव मूल्यांकन रक्‍कम देण्याचा प्रयत्न

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:25AMमुंबई : चंद्रशेखर माताडे 

साखरेचे भाव कोसळल्यानंतर ऊस उत्पादकांना नियमाप्रमाणे द्यावी लागणारी एफ.आर.पी.ची रक्‍कम देता येत नसल्यामुळे राज्य बँकेकडून साखरेच्या मूल्यांकनाच्या 5 टक्के अधिक रक्‍कम देण्याचे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्य बँकेला दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून साखर निर्यात अनुदान मिळेपर्यंत राज्य सरकारकडून ही अनुदानाची रक्‍कम देता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

यंदाचा गळीत हंगाम सुरू होताना साखरेचे भाव हे 3 हजार 600 रुपये क्‍विंटल एवढे होते. त्यामध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर सातत्याने घसरण सुरू झाली. आता तर हे भाव क्‍विंटलला 2 हजार 800 रुपये एवढे घसरले असून, या दरातही साखरेला मागणी नसल्याने गोदामात साखर पडून आहे. त्याचा परिणाम हा साखर उद्योग आर्थिक आरिष्टात सापडण्यात झाला आहे.

ऊस उत्पादकांना 14 दिवसांच्या आत एफ.आर.पी.ची रक्‍कम देणे कायद्याने बंधनकारक असले, तरी  साखरेच्या घसरलेल्या दरामुळे व साखरेला मागणीच नसल्याने कारखाने वेळेत हे पैसे देऊ शकत नाहीत. साखरेचे दर घसरल्यामुळे राज्य बँकेने त्याचे मूल्यांकनही 2 हजार 980 रुपये क्‍विंटलवरून 2 हजार 800 रुपयांपर्यंत घटविले आहे. या मूल्यांकनाच्या 85 टक्के रक्‍कम ही कारखान्यांना कर्ज म्हणून दिली जाते. या रकमेतून पूर्व हंगामी कर्जाचे 750 रुपये वसूल केले जातात. 

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बिले न मिळाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्याची दखल घेऊन राज्य सहकारी बँकेने मूल्यांकनाच्या 85 टक्क्यांऐवजी 90 टक्के रक्‍कम कारखान्यांना द्यावी, असे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत.

सहकारमंत्र्यांच्या या निर्णयामुळे साखरेच्या क्‍विंटलमागे किमान 180 रुपये तरी उपलब्ध होणार असून, ही वाढीव 5 टक्के रक्‍कम केवळ एफ. आर.पी. देण्यासाठीच वापरावी लागणार आहे. तसे बंधन घालूनच त्याचे वितरण करण्यात येणार आहे. 

Tags : Mumbai, An attempt to give 5 percent incremental assessment amount to FRP, Mumbai news,