Fri, May 29, 2020 03:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कथित गॅसगळतीने खळबळ

मुंबईत कथित गॅसगळतीने खळबळ

Published On: Sep 21 2019 1:33AM | Last Updated: Sep 21 2019 1:10AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : प्रसाद जाधव

पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक भागात गुरुवारी रात्री गॅसचा वास पसरल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली होती. पालिका, अग्निशमन दल आणि पोलिसांकडे याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या. पण, घटनास्थळी जाऊनही गॅसगळती नक्की कोठून होतेय हे सापडत नसल्याने संबंधित  प्रशासनाची तारांबळ उडाली होती. 

आरसीएफ आणि महानगर गॅसनेही त्यांच्याकडून गॅस गळती होत नसल्याचे सांगितल्याने नक्की कोठून गळती होते याचा शोध शुक्रवारी दिवसभरात लागला नाही.  चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, चुनाभट्टी भागात गुरुवारी रात्री साधारण 9 नंतर गॅस गळातीचा उग्र वास येत होता. अनेकांना वाटले महानगर गॅसची पाईपलाईन फुटली असावी, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. तर काही लोकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. पालिकेने ज्या भागातून तक्रारी येत होत्या त्या भागांची पाहणी केली मात्र कुठेही त्यांना गळती आढळली नाही. 

रात्री 10 वाजल्यानंतर घाटकोपर, विक्रोळी, पवई, चांदीवली, विलेपार्ले, अंधेरी, मालाड, बोरिवली, कांदिवली, सायन आदी भागांतून पालिकेकडे तब्बल 29 तक्रारी आल्या. सुरुवातीला मानखुर्द, गोवंडी, चेंबूर भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने घरगुती सिलेंडरमधून गळती होत असल्याचे वाटले म्हणून लोकांमध्ये भीती पसरली होती. प्रत्येकाने आपापले सिलेंडर तपासले. मात्र, काहीही आढळले नाही त्यातच इमारतीमध्ये राहणारे रहिवासी खाली उतरल्याने महानगर गॅस अथवा आरसीएफ कंपनीतून गॅस गळती होत असल्याचा लोकांचा समज झाला. 

ज्या भागातून गॅस गळतीच्या तक्रारी येत होत्या, त्या भागात अग्निशमन दलाच्या जवानांसह महानगर गॅसच्या कर्मचार्‍यांनी धाव घेऊन तपासणी केली. मात्र, त्यांना कुठेही गॅस गळती सापडली नाही. मात्र सतत गॅसचा वास येत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. महानगर गॅसने आपल्या कोणत्याही  पाईपलाईनमधून  गॅस गळती होत नसल्याचे स्पष्ट केले. तर गुरुवारी रात्री मुंबई पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ पथकांनी आरसीएफच्या ट्रॉम्बे युनिटला भेट दिली. मात्र त्याही ठिकाणी गळती आढळली नाही. 

आरसीएफनेही देखील आपल्या प्लाण्टमधून अशी कोणतीही गळती झाली नसल्याचे जाहीर केल्याने नक्की गॅसगळती कुठून होतेय हे शुक्रवारी दिवसभरात स्पष्ट झाले नाही. गुरुवारी रात्री 8 : 39 ते 11 :43 च्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला गॅस गळतीच्या  तक्रारींचे 82 फोन आले. घाटकोपर, पवई, चांदीवली, जोगेश्वरी मालाड, विलेपार्ले, बोरिवली या भागांचा त्यामध्ये समावेश आहे. स्थानिक पोलीस पथक त्या ठिकाणी त्वरित रवाना झाले. महानगर गॅस लिमिटेड, आरसीएफ, बीपीसीएल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या प्लांट व पाईपलाईनमधून कोणत्याही प्रकारची गळती झाली नसल्याचे सांगण्यात आले.

अग्निशमन दलाच्या 9 फायर इंजिन देखील गळतीच्या तक्रारी येत होत्या त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र गळतीचा स्त्रोत सापडला नाही. त्यानंतर एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले त्यांनी चेंबूरच्या आरसीएफ व विविध भागात जाऊन पाहणी केली मात्र त्यांना कुठेही गॅस गळती आढळून आली नाही. पहाटे साडेतीन वाजता गॅस गळती शोधण्याचे ऑपरेशन थांबवण्यात आले. त्यानंतर गॅस गळतीचा कोणताही फोन आला नसल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.