Mon, Jul 15, 2019 23:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमित-मिताली यांचा साखरपुडा

अमित-मिताली यांचा साखरपुडा

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:51AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. विशेष म्हणजे सोमवारी 11 डिसेंबर रोजी राज आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधत या साखरपुड्याचा मुहूर्त पकडण्यात आला. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

राज ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस सोमवारी असल्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा कृष्णकुंजवर करण्याचे ठरले होते. मात्र अचानक साखरपुड्याचे ठिकाण बदलण्यात आले आणि महालक्ष्मी रेसकोर्स येथील टर्फ क्‍लबवर हा समारंभ आयोजित करण्यात आला. मोजक्याच निमंत्रितांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. प्रसारमाध्यमांनाही कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. 

मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध बेरिअ‍ॅट्रिक सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. अमित-मिताली हे बालपणीचे मित्र असून मागील काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. अमित पोद्दार महाविद्यालयाचा, तर मिताली रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. अमित वाणिज्य पदवीधर असून त्याने व्यवस्थापनाचेही शिक्षण घेतले आहे, तर मिताली फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून द रॅक हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

शिवसेनेच्या युवा आघाडीची जबाबदारी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर आहे. मात्र अमित ठाकरे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अमित यांनी मनसेचा प्रचार केला होता.