Wed, Mar 20, 2019 08:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथच्या महिलेची दुबईतून सुटका 

अंबरनाथच्या महिलेची दुबईतून सुटका 

Published On: May 12 2018 1:48AM | Last Updated: May 12 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

अंबरनाथ येथुन दुबईला नोकरीसाठी गेलेल्या फरिदा खान यांचा कुटुंबियांशी संपर्कच तुटला. त्यामुळे त्यांचे पती  अब्दुल अजीज खान यांनी महिला आयोगाच्या सुहिता या हेल्पलाईनवर संपर्क साधला. त्यावरून महिला आयोग व परराष्ट्र मंत्रालयाने पाठपुरावा करून या महिलेला देशात परत आणले. फरिदा खान या कौटुंबिक गरजेपोटी दि. 27 जानेवारी 2018 रोजी दुबईला नोकरीसाठी गेल्या. मात्र त्यांना नंतर मस्कत ला पाठविण्यात आले.

त्यानंतर त्यांचा कुटुंबियांशी संपर्कच तुटला. त्यांना जिथे कामासाठी पाठविण्यात आले त्याठिकाणी त्यांचा छळ होत  होता. तसेच खान यांचा पासपोर्ट व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे त्यांच्या पतीनी महिला आयोगाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला. त्यानुसार आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांच्याशी संपर्क साधुन मदत करण्याची विनंती केली. स्वराज्य यानीही त्याची तातडीने दखल घेत स्वत: ओमानमधील भारतीय दुतावासाला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर दुतावासाने एजंटकडे चौकशी  सुरू केल्यानंतर फरिदा खान याना परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.  दि. 1 मे रोजी रात्री फरिदा खान यांना परत मुंबईला पाठविण्यात आले. याबाबत बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या की, सुहिता ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. फरिदा पती व दोन मुलींसह रहात आहेत. भविष्यात अशा घटना घडु नयेत म्हणुन आयोग परराष्ट्र मंत्रीलयामार्फत काम करणार आहे. महिलांची फसवणुक करणार्‍या एजंट विरोधात कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्याचे सांगितले.