Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रुळाला तडा

अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रुळाला तडा

Published On: Dec 30 2017 1:47AM | Last Updated: Dec 30 2017 12:59AM

बुकमार्क करा
अंबरनाथ : प्रतिनिधी

मध्य रेल्वेचे नेहमीचे रडगाणे काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी सकाळी रुळाला तडा गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे नेहमीप्रमाणेच शुक्रवारीही गर्दीच्यावेळी प्रवाशांचे मोठे हाल झाले. यावेळी आरपीएफच्या जवानाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे बदलापूर लोकलला होणारा मोठा अपघात टळला. या प्रकाराने जवळपास दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी पुन्हा एकदा संताप व्यक्‍त केला. 

या-ना त्या कारणाने रेल्वेचा लेटमार्क प्रवाशांचा रक्‍तदाब वाढवत असताना आता रेल्वे रुळाला तडा जावून प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान अंबरनाथजवळील बी केबीन येथील रेल्वे रुळ तुटलेला असताना याच रेल्वे रुळावरुन सकाळी 7.13 ची बदलापूर लोकल जाणार होती. मात्र याच दरम्यान रेल्वे रुळाची पाहणी करत असलेला आरपीएफचा जवान सुरेशकुमार मीना यांच्या ही बाब लक्षात आली. तब्बल एक फुटाइतका रुळाचा तुकडा तुटल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र वेळीच सुरेशकुमार मीना यांनी या ठिकाणी थांबून समोरून येणार्‍या बदलापूर लोकलला थांबण्याचा इशारा दिला. 

लोकल थांबत असताना तुटक्या रुळावरून तीन डबे पुढे गेले. मात्र यावेळी कोणताही अनर्थ घडला नाही. त्यामुळे उभ्या ट्रेनच्या खालील तुटलेला ट्रॅक दुरुस्त करण्याची वेळ रेल्वेवर आली. 
या कामात तब्बल दोन तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली.  

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष ?

याबाबत पहाटे साडेपाचच्या सुमारास सिग्‍नल मेंटेनन्स डिपार्टमेन्टच्या टीमने रेल्वे प्रशासनाला रेल्वे रुळाला तडा गेल्याचे सूचित केले होते. मात्र या सूचनेकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या तडा गेलेल्या रुळावरून पहाटे साडेपाच ते सातपर्यंत इतर लोकल आणि मेल गाड्या गेल्या होत्या. त्यानंतर हा तडा गेलेला रुळ तुटला.