होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबेडकर स्मारकाचे काम महिन्यात सुरू

आंबेडकर स्मारकाचे काम महिन्यात सुरू

Published On: Dec 07 2017 2:15AM | Last Updated: Dec 07 2017 2:11AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे एका महिन्याच्या आत स्मारक उभारणीचे काम प्रत्यक्ष जागेवर सुरू  होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी चैत्यभूमी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ.आंबेडकर यांच्या    संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. संविधानामुळे शक्तीशाली देश निर्माण झाला. जगात भारताकडे कौतुकाने पाहिले जाते. देशातील दीन दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकांपर्यत परिवर्तन करण्याकरिता त्यांनी संविधानाच्या माध्यमातून एक शस्त्र दिले आहे. त्यांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली

डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, विधानपरिषद सदस्य निलम गोर्‍हे आदी मान्यवरांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.