Tue, Jul 16, 2019 12:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबेडकर स्मारक 2020 पर्यंत पूर्ण होणार

आंबेडकर स्मारक 2020 पर्यंत पूर्ण होणार

Published On: Apr 14 2018 1:52AM | Last Updated: Apr 14 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी

इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. 2019 पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरूपात दिसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. 

डॉ. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदू मिलमध्ये स्मारकाच्या जागेची तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. स्मारकाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.  मुंबईत येणार्‍या प्रत्येक नागरिकाला  स्मारकाच्या उंचीमुळे वांद्रे वरळी सी लिंकवरून देखील दर्शन घेता येईल, असे ते म्हणाले. स्मारकासाठीच्या  सर्व परवानग्या  मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाच्या काम कालबध्द पध्दतीने वेळेत पुर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

मुंबईतील शापुरजी पालनजी या ख्यातनाम बांधकाम कंपनीला स्मारक उभारणीचे काम देण्यात आले आहे. या कंपनीची 709 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून येत्या 3 वर्षांमध्ये स्मारक उभे राहणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. राजकुमार बडोले यांनी दिली. स्मारकाच्या महत्वाच्या टप्प्यातील कामे दोन वर्षात तर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल. या कामासाठी 763 कोटी रुपयांच्या रकमेला सुधारित प्रशासकीय मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले. लंडन येथे शिक्षण घेत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ज्या घरात रहात होते, ते घर राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे. शासनाने त्या घराची दुरुस्ती केली असून या वास्तुला आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याबाबत लंडन येथील सल्लागार समितीने सूचविलेल्या शिफारशींची पुर्तता करण्यात आली आहे. या वास्तुला लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार असल्याचा विश्‍वास बडोले यांनी व्यक्‍त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या वास्तुमध्ये 18 ते 20 एप्रिल दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

Tags : Mumbai, Ambedkar, memorial, completed, 2020