मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारिणी समितीची बैठक आज नागपूरमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये दादर येथील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम करण्यासाठी मे. शाहपुरजी पालनजी आणि को.प्रा.लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच डी.एन.नगर ते बीकेसी या मेट्रो-2 ब च्या व्हाया डक्ट आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता मे. सिम्प्लेक्स इन्फ्रा लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मंडाले येथील मेट्रो डेपोकरता सविस्तर संकल्पचित्र सल्लागार आणि कंत्राटदार म्हणून अनुक्रमे मे. सिसट्रा एमव्ही कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. एमबीझेड-युक्रेन आणि मे आरसीसी इन्फ्रा व्हेनचर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राधिकरणाने काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये शाहपुरजी पालनजी या एकाच कंपनीने निविदा सादर केली आहे. प्राधिकरणाने या स्मारकासाठी 622 कोटी रूपयांची निविदा काढल्या असताना शाहपुरजी पालनजी कंपनीने 783 कोटी खर्चाची निविदा सादर केली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण ही आपल्या पिढीसाठी लाभलेला आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद पुढील पिढीकरता देखील महत्त्वाचा ठरणार आहे. आमचे हे भाग्य आहे की त्यांचा हा वारस या भव्य सामरकाच्या रूपात असाच पुढे राहणार आहे, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी.एस मदान यावेळी म्हणाले. तसेच मेट्रो-2 ब च्या बाबतीत सांगायचे झाल्यास येत्या वर्षात या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात होण्याच्या दृष्टीने कंत्राटदार आणि सल्लागारांची नियुक्ती ही एक मोठी झेप आहे. प्रवाशांची सुविधा लक्षात घेता ही मार्गिका इतर मेट्रो मार्गिकेप्रमाणेच महत्त्वाची ठरेल, असेही मदान यावेळी म्हणाले.