Wed, May 22, 2019 21:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अ‍ॅमेझॉनला लाखोंचा गंडा घालणार्‍यांना बेड्या

अ‍ॅमेझॉनला लाखोंचा गंडा घालणार्‍यांना बेड्या

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:24AMभिवंडी : वार्ताहर 

भिवंडी तालुक्यातील गोदाम भागात असलेल्या विश्वविख्यात अ‍ॅमेझॉन ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांसाठी निघालेले महागडे मोबाईल, लॅपटॉप कुरियर कंपनी कर्मचार्‍यांच्या सहकार्याने लंपास करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात भिवंडी गुन्हे शाखेस यश आले आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 57 मोबाईल, 3 लॅपटॉप असा सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उमेश गुळवी, हुसैन रफिकुद्दीन, संदीप सराफ, सचिन पटाळे अशी या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी अजून मोठ्या चोरीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत होणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली. 

तालुक्यातील दापोडा येथील डिलिव्हरी डॉट कॉम या कुरियर कंपनीच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन कंपनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवत असते. अशावेळी ग्राहकांनी वस्तू स्वीकारण्यास नकार दिल्यास अथवा पत्ता न सापडल्यास अशा वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कंपनी सीलबंद करून पुन्हा माघारी अ‍ॅमेझॉन कंपनीकडे पाठवत असे. परंतु मागील चार महिन्यात अ‍ॅमेझॉन कंपनीस मिळणार्‍या वस्तूंची गोळाबेरीज जमत नसल्याने त्यांनी डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीकडे तक्रार केली. यानुसार कुरियर कंपनीचे सुरक्षा अधिकारी मंगेश मोहिते यांनी नारपोली पोलीस स्टेशन येथे 24 लाख रुपयांच्या मालाचा परस्पर अपहार झाल्याची तक्रार दाखल केली असता त्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस नाईक राजेंद्र सांबरे, किशोर माने, अनिल पाटील, पोलीस शिपाई प्रमोद धाडवे, श्रीधर गुंडेकरी या पथकाने यासंदर्भात कसून चौकशी केली. त्यात या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी डिलिव्हरी डॉट कॉममधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन, अ‍ॅमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे हे आपल्याकडील महागडे मोबाईल वंजारपट्टी नाका येथे विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार याठिकाणी सापळा रचून पोलीस पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळल्या. 

या चौघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे ज्या अ‍ॅमेझॉन कंपनीमधून कोट्यवधी रुपयांची चोरी होत असताना त्याबाबत माहिती देण्यासाठी कंपनीकडून कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहे? हे तपासण्याचे मोठे आव्हान भिवंडी गुन्हे शाखेसमोर आहे.