Tue, Jul 23, 2019 17:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना युतीबाबत कायमच सकारात्मक - पंकजा मुंडे 

शिवसेना युतीबाबत कायमच सकारात्मक - पंकजा मुंडे 

Published On: Apr 07 2018 9:26PM | Last Updated: Apr 07 2018 9:43PMठाणे - प्रतिनिधी 

शिवसेनेशी युती बाबत माझी भूमिका कायमच सकारात्मक आहे, शिवसेना पक्षाशी माझे नाते आहेच, परंतु ठाकरे परिवारांशीही माझे नाते वेगळे आहे, त्यामुळे मी युतीबाबत कायमच सकारात्मक आहे, अशी इच्छा राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. एका दैनिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास पंकजा मुंडे शनिवारी ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी युतीची जी ताकद एकवटली होती, ती ताकद तशीच ठेवली तर विरोधक वृत्तींच्या विरोधात लढू शकतो, आम्ही एकत्रित असलो तर त्या प्रवृत्तींना विरोधात चांगले लढू, असे मुंडे यावेळी म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचे बॅनरवर छायाचित्र नसल्याने त्यांच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीबद्दल विचारले असता, मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांचे समर्थन करणारे केवळ बीड मधीलच कार्यकर्ते नव्हते, तर विदर्भातलेही कार्यकर्ते होते. मी आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी त्या कार्यकर्त्यांना समजावले. या मेळाव्यात सगळ्यांनी मुंडे साहेबांबद्दल सर्वांनीच व्यासपीठावर आदर व्यक्त केला असल्याचेही  मुंडे यांनी सांगितले.  

या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो लागला नाही, या प्रश्नावर विचारले असता त्या म्हणाल्या, मी पक्षाची कार्यकर्ती आहे, पक्षाची शिस्त पाळणे हे माझे काम आहे, आणि पक्षाची शिस्त न पाळणे हे माझ्या आणि मुंडे साहेबांच्याही संस्कारात बसत नाही. जे प्रोटोकॉल नुसार होणे आवश्यक होते, ते व्हायला पाहिजे होते, पण ते झाले नाही तर त्यावर भाष्य करायला नको, असे सांगत त्यांनी मेळाव्यातल्या छायाचित्र प्रकरणावर पडदा टाकला. 

भगवानगडाच्या वादाबाबत त्या म्हणाल्या, भगवानगडाचा मुळात वादच नाही, याला वाद कसे म्हणता येईल, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मंहतांनी भगवानगडावर मेळावा होणार नाही, असे जाहीर केले होते, मात्र समाजाला तिथे मेळावा हवा होता, त्यामुळे तिथे चुकीची गोष्ट घडू नये, म्हणून मी सावरगावला मेळावा घेतला, त्यामुळे आता त्यावर कोणीच टिप्पणी करण्याचे कारण नाही, सावरगावच्या मेळाव्याला भगवानगडापेक्षा दीड - दोन पट जास्त लोक आले होते, त्यामुळे त्या विषयावर कधीच पडदा पडला आहे, असे त्या म्हणाल्या. मंहतांविषयीच काय मी कुणाविषयीच कधी अपशब्द काढत नाही, मी कायम त्या गादीचा सन्मान केला आहे, याचा त्यांनी पुर्नरच्चार केला. 

युतीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांवर राष्ट्रवादी पक्षाकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देतांना, धनंजय मुंडे यांचा नामोल्लख टाळून त्या म्हणाल्या, जेव्हा- जेव्हा ते बोलतील, त्यातले काय खरे आहे, हे कायदेशीरदृष्ट्या तपासून पाहिले पाहिजे, कारण त्यांनी आतापर्यंत माझ्यावर जेव्हा - जेव्हा आरोप केले, ते केवळ आरोपच होते,हे सिध्द झाले आहे, मात्र आमच्यावरचे आरोप खोटे सिध्द झाले की ती खोटी क्लीन चिट आणि स्वतःवरच्या आरोपाची क्लीन चिट खरी म्हणायची, हा त्यांचा आक्रस्ताळेपणा आहे, मी यावर काही उत्तर देण्यापेक्षा सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना तेच विरोधी पक्ष म्हणून उत्तर देतील, असा टोला मुंडे यांनी लगावला.