होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्ना आधीच नवरदेव पोलिस कोठडीत

लग्ना आधीच नवरदेव पोलिस कोठडीत

Published On: Feb 12 2019 10:10PM | Last Updated: Feb 12 2019 10:10PM
विरार : प्रतिनिधी 

स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला आलेला मोबाईल चोर लग्नाच्या आदल्या दिवशी वालीव पोलिसांच्या हाती लागला. यामुळे या चोर नवरदेवाला लग्न मंडपात बसण्याऐवजी आता पोलिस ठाण्यात बसावे लागले. पोलिसांनी त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. फिरोज अन्सारी (वय ३४, रा. भिवंडी ) असे या मोबाईल चोरट्याचे नाव आहे. 

भिवंडी येथे राहणारा फिरोज अन्सारी हा मोबाईल चोरटा आहे. फिरोजचे रविवार (ता.१०) लग्न होते. लग्नाची पत्रिका देण्यासाठी तो विरार येथील आपल्या बहिणीकडे आला होता. तेथून मित्र, नातेवाईक यांना भेटण्यासाठी वालीव परिसरात आला होता. यावेळी त्याने तेथील एका माणसाला धक्का मारत त्याच्याशी भांडण सुरु केले आणि त्याच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. यावेळी या मोबाईल धारकाने आरडाओरड करताच नागरिक आणि तेथील पोलिसांनी फिरोज पकडले. पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत त्याला वसई न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.