Tue, Aug 20, 2019 04:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेचा मुख्यंमत्रीपदाचा दावा; १५२ जागांची मागणी

शिवसेनेचा मुख्यंमत्रीपदाचा दावा; १५२ जागांची मागणी

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:48AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपकडे 152 जागांची मागणी करत मुख्यमंत्री पदावरही दावा ठोकला आहे. तसेच 2014 चा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य असल्याचे समजते.

केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपा आपल्याला चांगली वागणूक देत नसल्याची शिवसेनेची तक्रार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पक्षांमध्ये खटके उडत आहेत. पोटनिवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकले जात असल्यामुळे त्यामध्ये आणखी भर पडत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपासाठी ही चिंतेची बाब असल्यामुळे दोन्ही पक्षांमधील कटुता दूर करण्यासाठी भाजपाच्या संपर्क अभियानाचे निमित्त साधत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत येऊन मातोश्रीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांची भेट घेतली. 

मातोश्रीवर सुमारे अडीच तास या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यामुळे सत्ताधारी पक्षांमधील वातावरण निवळेल, अशी शक्यता होती. पण शिवसेनेने या भेटीचा राजकीय फायदा उचलत भाजपकडे पुढील निवडणुकांसाठी जादा जागेची मागणी करत भाजपाला खिंडीत गाठल्याची चर्चा आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 48 पैकी 24 जागा लढविल्या. त्यापैकी 23 जागांवर विजय मिळाला. तर 21 पैकी 18 जागा शिवसेनेने पटकावल्या.  मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी जागावाटप न पटल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वळावर निवडणूक लढविली. भाजपने 260 मतदारसंघात उमेदवार उभे केले असता 122 जागा जिंकल्या. तर 282 जागा लढविणार्‍या शिवसेनेला 62 जागांवर समाधान मानावे लागले.     

या निवडणुकानंतर राज्यात गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे पक्ष एकमेकांसमोर ठाकले होते. प्रचारातील आरोपांमुळे आपआपसात खटके उडू लागल्यामुळे शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी स्वबळावर लढल्यास होणारे नुकसान उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरल्याचे समजते.