Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर पोटनिवडणुकीत दिवसाढवळ्या पैसेवाटप?

पालघर पोटनिवडणुकीत दिवसाढवळ्या पैसेवाटप?

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 26 2018 1:46AMडहाणू ग्रामीण : वार्ताहर

पालघर  लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आता दिवसाढवळ्या पैशांचा बाजार सुरू झाल्याची घटना शुक्रवारी उघड झाली आहे. डहाणू तालुक्यातील रानशेत येथे पैसे वाटप करताना 8 व्यक्तींना पकडण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रानशेत येथे काही तरूण मतदारांना प्रलोभित करण्यासाठी पैशांचे वाटप करत असल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी याबाबत वरिष्ठ नेत्यांना कळवून संबंधितांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिसांना बोलावून आरोपी तरुणांची चौकशी करण्यात आली असता अशोक आंबोरे या भाजपच्या व्यक्तीने पैसै वाटप करण्यासाठी पाठवल्याची कबुली संबंधित तरुणांनी दिली. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, संजय राऊत, श्रीकांत  शिंदे, आमदार अमित घोडा यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

दरम्यान, पैसे वाटपाबाबत शिवसेनेने भाजपवर केलेला आरोप धादांत खोटा असल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. तसेच मतांसाठी पैसे वाटण्याची परंपरा शिवसेनेचीच आहे, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेने भाजपवर केलेला आरोप पूर्णत: खोटा असून पैसे वाटप करताना पकडलेला कार्यकर्ता भाजपचा नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

पैसे वाटण्याची कार्यपद्धती सेनेचीच

आमचा विकासाच्या कामांवर विश्‍वास आहे, त्यामुळे निवडणुकीत पैसे वाटण्याची वेळ भाजपवर कधीच येत नाही. त्यामुळे पैसे वाटप करणारी व्यक्ती भाजपची नाही, हे आपण खात्रीपूर्वक सांगतो. उलट मतांसाठी पैसे वाटणे ही शिवसेनेचीच कार्यपद्घती आहे आणि त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. कल्याण लोकसभा निवडणूकीत जेव्हा दिवंगत वसंत डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवार होते, तेव्हा उल्हासनगर निवडणुकीत अशाच स्वरूपाची एक ध्वनिचित्रफित दाखवून त्यांची बदनामी करण्यात शिवसेनेचाच हात होता, असा दाखला रवींद्र चव्हाण यांनी दिला.