होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'जातीय तेढ वाढविण्यासाठी काँग्रेसने एजन्सी नेमली'

'जातीय तेढ वाढविण्यासाठी काँग्रेसने एजन्सी नेमली'

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 10:37AMमुंबई : वृत्तसंस्था

भाजप आणि शिवसेनेतील दुरावा शिगेला पोहोचला असतानाच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ‘मातोश्री’वर भेट देण्यापूर्वी शिवसेनेसोबत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होणार आहे, असा दावा केला. त्यामुळे शिवसेना नेतृत्व काय भूमिका घेते, याबाबत आता उत्सुकता लागली आहे. ‘मातोश्री’वर आगमन झाल्यानंतर शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा केली.

भाजपने आपल्या दुरावलेल्या मित्रांसह अन्य पक्षांच्या प्रमुखांचा रागरुसवा काढून पुन्हा एकदा त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान सुरू केले आहे. शाह हे याच अभियानांतर्गत उद्धव यांना भेटणार आहेत. या भेटीत ठाकरे यांच्याशी शाह नेमके काय बोलणार किंवा उद्धव आपल्या तक्रारी शाह यांच्यापुढे मांडणार काय, याबद्दल आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.

मतभेद मिटविण्याचे अमित शाह यांचे संकेत 

मित्रपक्षांमध्ये आपापसात कुरबुरी होतच असतात. त्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीवर परिणाम होणार नाही. 2019 नव्हे, तर 2024 च्या लोकसभा आणि  विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेसोबत युती अबाधित राहील, असा ठाम विश्‍वास भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

भाजपच्या वतीने ‘संपर्क से समर्थन’ हे अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानासाठी मुंबईत आलेल्या अमित शाह यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवसेनेशी युती करण्याची भूमिका मांडली. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेसोबत आमची युती होईल आणि 2019 च्या निवडणुकाही आम्हीच जिंकू, असे शाह म्हणाले. 
देशात जातीय तेढ निर्माण करण्यास काँगे्रस पक्षच जबाबदार आहे. समाजासमाजांत जातीय तेढ वाढविण्यासाठी काँग्रेसने एजन्सी नेमली आहे, असा हल्लाही शहा यांनी चढविला. 

ज्यांनी देशात आणीबाणी लागू केली त्या काँग्रेसने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकवू नये. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे. आमचे विरोधकही टीकेनंतरही अबाधित आहेत. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र हे देशविरोधी नसावे, असे शहा म्हणाले. 

विरोधी पक्षांची एकजूट ही राज्यापुरती मर्यादीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबी हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तर विरोधकांना मोदींना हटवायचे आहे, असा टोला लगावतानाच लोकांमध्ये सरकारविरोधात भावना असल्याचा समज साफ खोटा असल्याचे शहा यांनी सांगितले. अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचेही कौतूक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार लोकाभिमुख काम करत आहे. जनताही त्यांच्या बाजूने उभी राहीली आहे, असे ते म्हणाले. 

केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोस पावले उचलली आहेत. देशाची अर्थव्यवस्थाही बळकट झाली आहे. भारतीय लोक हे देशाचा गौरव वाढविणार्‍या नेत्याच्या शोधात होते. मोदींनी देशाचा गौरव वाढविला आहे. त्यामुळे मोदींवर जनतेचा विश्‍वास असून 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हीच लोकसभेची निवडणूक जिंकू, असा दावा शहा यांनी केला. पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसपेक्षा आमचे यश चांगले आहे. काँग्रेसचे राजकीय अस्तित्व कमी होत चालले आहे. 

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुका त्यांनी भाजपविरोधात लढवलेल्यादेखील आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याखेरीज ठाकरेंचा एकही दिवस जात नाही. भाजपनेही आता सेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी सुरू केलेली असताना अमित शाह ‘मातोश्री’वर जात आहेत. याआधी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी शाह यांनी ‘मातोश्री’वारी केली होती.

दरम्यान, शाह यांनी आज मुंबई दौर्‍यात उद्योगपती रतन टाटा यांच्यासह सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेसोबत युती कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अमित शाह यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.  दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी शाह यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या निवासस्थानी पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा केली.

पंचवीसहून अधिक वर्षे टिकलेली सेना-भाजप युती 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र तुटली होती. निवडणुकीनंतर मात्र शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाली होती. अमित शाह हेच युती तुटण्यास जबाबदार असल्याच्या समजाने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. युती तोडावी, या मताचे कट्टर समर्थक असलेले संजय राऊत हे ‘सामना’तून अमित शाह यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. सेनेकडून सतत टीका होत असताना भाजपने मात्र नेहमीच युती टिकली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.