Mon, Jun 17, 2019 18:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील सर्व हॉटेल्सचा सामूहिक बंद

ठाण्यातील सर्व हॉटेल्सचा सामूहिक बंद

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 1:54AMठाणे : प्रतिनिधी 

फायरची कोणत्याच प्रकारची प्रक्रिया पूर्ण न करणार्‍या बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर पालिकेच्या अग्निशमन विभागाने कारवाई करायला सुरुवात करताच या कारवाईच्या विरोधात ठाण्यातील 500 हॉटेल्स व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारी 4 पासून सर्व हॉटेल्स बंद ठेवली. 

फायरच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना पूर्ण करूनही अग्निशमन विभागाच्या वतीने जाचक अटी लावण्यात येत असल्याचा मुद्दा हॉटेल्स व्यावसायिकांनी मांडला आहे. बुधवारी सकाळी पालिका आयुक्तांबरोबर होणार्‍या बैठकीत तोडगा निघेपर्यंत सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल्स व्यावसायिकांनी घेतला आहे. 

नोटीस देवूनही कोणतीही कार्यवाही न करणार्‍या  86 हॉटेल व बारपैकी 13 हॉटेल व बार अग्निशमन दलाने सील ठोकले. म्हणजे नियम भंग करूनही त्याबद्दल होणार्‍या कारवाईच्या विरोधात हॉटेल चालकांनी बंदचे हत्यार उचलले आहे.महाराष्ट्र अग्निशमन कायद्याअंतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या अटींचे पालन केले आहे. तसेच बी फॉर्म देखील भरून दिला आहे. असे असतांनादेखील महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी लादल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानेच हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशनने दिली. 

अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण 426 हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास 80 आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. तसेच 260 प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण 86 हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर शनिवारी अग्निशमन विभागाने शहरातील तब्बल 13 हॉटेल सील केले होते. टप्प्याटप्प्याने उर्वरित हॉटेलही सील केले जाणार आहेत. परंतु आता शहरातील तब्बल 500 हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या विरोधात असहकार पुकारला आणि मंगळवारी दुपारी अचानक बंद पुकारला.