Fri, Apr 26, 2019 19:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्व अनुदानित शिक्षकभरती आता राज्य शासन करणार

अनुदानित शिक्षकभरती आता राज्य शासन करणार

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 2:42AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्व अनुदानित म्हणजेच खासगी शाळांची शिक्षक भरती आता सरकारच करणार असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘पवित्र’ ही नवीन संगणकीय प्रणालीदेखील विकसित केली आहे. टेट दिलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. परिणामी, गेली दहा वर्षे रखडलेल्या शिक्षक भरतीला मुहूर्त तर लागलाच शिवाय या भरतीवर असलेले शिक्षण सम्राटांचे नियंत्रणही आता उठले आहे.

राज्यभरातील शिक्षक भरतीचा बाजार उठवणारा हा जीआर तथा शासन आदेश बुधवारी रात्री उशिरा जारी करण्यात आला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील शाळांची शिक्षक भरतीही राज्य शासनाने आपल्या नियंत्रणात घेतली असून, अल्पसंख्याक संस्था वगळून सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांचे शिक्षक यापुढे ‘पवित्र’ प्रणालीद्वारेच भरती केले जातील. 

शिक्षण सेवक भरती प्रक्रिया आवश्यकतेनुसार वर्षातून दोन वेळा होणार असून शिक्षकांची निवड डिजिटल पध्दतीने करण्यात येईल. टेट पात्र उमेदवार www.edrrvaff.mahararshtra.gov.in या संकेतस्थळावर जावून शिक्षक भरतीचा अर्ज भरू शकतील. अर्ज भरण्यासाठी टेट परीक्षेचा क्रमांक हाच लॉगीन आयडी म्हणून वापरावा आणि पासवर्ड स्वत: तयार करायचा आहे. पासवर्डची प्रक्रिया मोबाईलवरील ओटीपी टाकून करावी. नोंदणी, वैयक्तिक माहिती व अर्ज त्यात भरावयाचे आहेत. सेल्फ अ‍ॅटेस्टेड केल्यानंतर अर्जात बदल करता येणार नाही. टेट परीक्षेतील जात, जन्मतारीख, मीडिअम, कॅटेगिरी यात बदल करता येणार नाही. जे विद्यार्थी टेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरताना मिस मॅच होत असेल तर त्याबाबत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रत उमेदवारांनी जतन करून ठेवावी. प्राप्त प्रिंटवर वॉटरमार्क आणि शिक्षण संचालक (प्राथमिक/ माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षर्‍या बंधनकारक आहेत. 

संस्था व शाळांनी पार्टलवर माहिती भरण्याची तयारी केली पाहिजे, असेही कळवण्यात आले आहे. 2017-18 ची संच मान्यता अद्ययावत करून त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांचे संस्था स्तरावर समायोजन करावे. रक्त, अतिरिक्त पदांची माहिती पोर्टल सुरू झाल्यानंतर भरावी. पदे कमी असल्यास संस्थेचा अनुशेष तपासून अद्ययावत करावा. त्यात समांतर आरक्षणाची माहितीही आवश्यक आहे. संस्थांनी अनुशेष त्यात्या शिक्षणाधिकार्‍यांकडून (माध्यमिक) तपासून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद यांना दरवर्षीच्या एक जानेवारी व एक ऑक्टोबर रोजी रिक्त असलेल्या पदांनुसार त्यांची बिंदूनामावलीची नोंद सरल प्रणालीवर अद्ययावत करावी लागणार आहे. संस्थेने शिक्षकांची मागणी केल्यास त्यानुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध होईल. उमेदवाराला पवित्र संगणक प्रणालीवर आपला अर्ज आणि बुद्धीमत्ता चाचणीमधील गुणांसह ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यानुसार गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवडसूची तयार होणार आहे.