Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अलिबाग : आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

अलिबाग : आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

Published On: Jul 25 2018 7:57PM | Last Updated: Jul 25 2018 7:57PMअलिबाग : प्रतिनिधी 

अलिबाग तालुक्यातील रेडिसन या सेव्हन स्टार रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफार्श स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला आहे. सेक्स रॅकेटमध्ये पकडलेल्या 5 सेक्स कॉलगर्ल महिला, 1 दलाल महिला व 3 पुरुष अशा 9 जणांना अटक करण्यात आले आहे. यातील पीडित महिला या कोलंबिया, अमेरिका या शहरातील आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे  न्वेषणचे पोलिस निरीक्षक शेख यांनी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या 9 जणांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, 4 आरोपीना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर 5 पीडित महिलांना कर्जत सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा गावात रेडिसन सेव्हन स्टार रिसॉर्ट आहे. या हॉटेलमधून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला लागली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सदीपकुमार रवींद्रकुमार सिह (वय 30) रा. धारावी, नितेश राजनंद सिंग (40) रा. विरार, दोघेही चालक, नरेश सुंदरलाल खाटील (42) बांद्रा, ट्रॅव्हल्स एजंट व डॅफनी क्लेरा लिकन पॅपी (60) भाईंदर, दलाल तसेच 5 सेक्स कॉलगर्ल महिला याना ताब्यात घेतले आहे. सेक्स रॅकेट चालविणार्‍यांनी सोशल साईट तयार केली होती.

यासाठी त्यांनी या सोशल साईटवर मोबाईल नंबर दिला होता. या नंबरवर फोन करून ग्राहक शारीरिक सुखासाठी आपल्याला हव्या असलेल्या मुली निवडत असत. एका रात्रीसाठी या मुली 1 ते 2 लाख रुपये एवढी रक्कम स्वीकारत असत. यासाठी ग्राहकाला त्याच्या खात्यात पैसे भरावे लागत असे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दलाल हा अलिबाग येथील रेडिसन या सेव्हन स्टार रिसॉर्ट मध्ये मुलींना पाठवत असे. स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाचे पोलीस निरीक्षक शेख यांनी या सोशल साईटवर जाऊन माहिती घेतली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने फोन करून आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात काही पैसे भरले. त्यानंतर 24 जुलै रोजी अलिबाग येथील रेडिसन रिसॉर्ट मध्ये 3 परदेशी कॉलगर्लना एका इसमाबरोबर पाठवून दिले. पोलिसांचे तयार केलेल्या तीन बोगस ग्राहकांनी ठरलेले पैसे त्या कोलगर्लना दिले. त्यानंतर त्या कॉलगर्लनी समोरच्या व्यक्तीस फोन करून पैसे मिळाल्‍याचे कळविले. त्यानंतर तिन्ही परदेशी कॉलगर्लनी रूममध्ये प्रवेश केला. त्याचवेळी बोगस ग्राहकांनी पोलिसांना इशारा केल्यानंतर पंचनामा करून तिन्ही परदेशी कॉलगर्ल्सना अटक केली. त्यानंतर त्या कोलगर्ल्सना घेऊन आलेल्या चालकांना अटक केली. त्याच्याकडून माहिती घेऊन दलाल महिलेला व ट्रॅव्हल्स एजंटला ताब्यात घेतले. सदर ताब्यात घेतलेल्या 5 महिला या कोलंबिया, दक्षिण अमेरिका या देशातील रहिवाशी असून टुरिस्ट व्हिसाद्वारे त्या भारतात आल्या होत्या. संबंधित अटक केलेल्या दलाल आरोपी महिला व इतरांनी त्यांना बंगलोर, दिल्ली, पुणे, चंदीगड, हैद्राबाद, अलिबाग इत्यादी ठिकाणी त्याच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याची कबुली दिली आहे. अलिबागमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला असल्याने जिल्ह्यातील इतर मोठ्या रिसॉर्ट व हॉटेल मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेट करणार्‍याचे धाबे दणाणले आहेत. तर असे सेक्स रॅकेट जिल्ह्यात सुरू असतील तर त्यावर कारवाई केली जाईल असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शेख यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलिस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक जे. ए. शेख, स पो नि सचिन सस्ते, पो ऊ नि दिलीप पवार, अमोल वळसंग व पोलीस कर्मचारी यांनी यशस्वी कारवाई पार पाडली.