Wed, Jun 26, 2019 17:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मद्यधुंद स्कूल बसचालकाच्या स्टीअरिंंगवरच डुलक्या!

मद्यधुंद स्कूल बसचालकाच्या स्टीअरिंंगवरच डुलक्या!

Published On: Jul 27 2018 1:48AM | Last Updated: Jul 27 2018 1:23AMठाणे : प्रतिनिधी

मद्यधुंद असलेला स्कूल बसचा ड्रायव्हर स्टेअरिंगवरच डुलक्या काढत होता व ते पाहून जीवाच्या आकांताने विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला होता. विद्यार्थ्यांचे नशीब इतके बलवत्तर की त्याचवेळी गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांने विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून ती बस थांबवली व त्या मद्यधुंद चालकास ताब्यात घेतले. हा प्रकार गुरुवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास ठाण्यात घडला. दरम्यान,पोहवा बागुल या वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळल्याने वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

गुरुवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बागुल हे क्रेनमधून गस्त घालीत असताना लुईसवाडी सर्विस रोड येथे सरस्वती सेकंडरी स्कूल नौपाडा या बसमधील मुले ओरडण्याचा आवाज त्यांना आला. हा आवाज ऐकून बागुल यांनी सदर बस तात्काळ थांबवली. बसचा चालक सुरेश गंगाराम शिरवळे (राहणार- रामचंद्रनगर, ठाणे) हा दारू प्यायल्याने स्टेअरिंगवर डुलक्या घेत होता!

बागुल यांनी बसचालकाला खाली उतरवून त्याची चौकशी केली. त्यानंतर सदर बसचालकास बाजूला करुन दुसर्‍या चालकाच्या मदतीने बस वागळे स्टेट वाहतूक उपविभाग येथे आणली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सदर गाडीमध्ये पोलीस व दुसरा चालक बसवून मुलांना ज्ञानेश्वर नगर येथील त्यांचे घरी सुखरूप पोहचवले. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. वाहतूक पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.