Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गटारीला महागाईची ऐशीतैशी

गटारीला महागाईची ऐशीतैशी

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:27AMठाणे : नरेंद्र राठोड

यंदाच्या गटारीवर महागाईचे सावट असून मद्याच्या दरात 15 ते 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. तरीदेखील मद्याच्या विक्रीत यंदा 20 टक्के वाढ होणार असल्याचे जाणकार सांगतात. तर मटण, चिकनच्या दरात देखील 25 टक्के भाववाढ करण्यात आली आहे, तरी चिकन, मासे आणि त्यापाठोपाठ मटणाच्या मोठ्या ऑर्डर्स येत असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. 

गटारी साजरी करण्यासाठी शहरातील चिकन, मटण व्यापार्‍यांनी मोठी तयारी केली असून, तब्बल 30 टन चिकन, 15 टन मटण आणि चार टन माशांची विक्रीसाठी ऑर्डर आधीच बुक असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. गेल्या महिन्यापासून मांसविक्रीत फारशी तेजी नसल्याने किमान गटारीला तरी चांगली मागणी येईल, अशी विक्रेत्यांना अपेक्षा आहे. गटारीच्या दिवशी सर्वाधिक मागणी चिकनला असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. 

चिकनबरोबरच मटणाचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी मागील आठवड्यापासूनच बोकड खरेदी करून ठेवले होते. गटारीच्या दिवशी 12 ते 15 टनांपर्यंत मटणविक्री होण्याचा अंदाज आहे. सध्या मटण 460 ते 480 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. हॉटेल चालकांनीही मटण विक्रेत्यांना दुप्पट ऑर्डर्स दिल्या आहेत.