Sat, Nov 17, 2018 14:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्ता आल्यास उत्तर प्रदेशात ‘शिवाजी पार्क’

सत्ता आल्यास उत्तर प्रदेशात ‘शिवाजी पार्क’

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची पुन्हा सत्ता आल्यास तेथे दोन हजार एकर जागेत शिवाजी महाराजांचे पार्क उभारू, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमय्या मैदानावर झालेल्या मेळाव्यात रविवारी केली.

शीव येथील सोमय्या मैदानात यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजवादी पक्षातर्फे महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या रॅलीच्या  माध्यमातून समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकांचे बिगूल फुंकल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी स्पष्ट केले. 

अखिलेश पुढे म्हणाले, भाजपने केंद्रात सत्तेवर येण्यासाठी जाती-पातीच्या व धर्माच्या आधारावर मते मिळवली व द्वेषाचे राजकारण केले. आम्ही विकासाच्या नावावर मते मागितली होती मात्र भाजपने दिवाळी व ईदचा उल्लेख करून मते मिळवली. त्यांनी पंधरा लाख रुपये देण्याचे खोटे आश्‍वासन दिले. राज्यात भाजपचे सरकार असताना देखील कर्जमाफी झाली नाही, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

अखिलेश म्हणाले, महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. मात्र देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यादेखील महाराष्ट्रात होत आहेत. भाजपने सत्तेवर आल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी दिली नाही. सरकार विकासाच्या नावावर केवळ भ्रम पसरवत आहे. 

अहमदाबादमध्ये मेट्रोचे केवळ पिलर आहेत.मात्र  आम्ही उत्तर प्रदेशमध्ये मेट्रो सुरू केली. भाजपाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. महाराष्ट्रात व गुजरातमध्ये  आरक्षण मागितले जात आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही बॅकवर्ड असलो तरी फॉरवर्ड काम करत आहोत, असे ते म्हणाले.