Wed, May 22, 2019 15:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रंगभूमीच्या इतिहासाला उजाळा

रंगभूमीच्या इतिहासाला उजाळा

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:26AMठाणे : अनुपमा गुंडे

महाराष्ट्राची  संगीत, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी किती समृद्ध होती, एकेकाळी रंगभूमी गाजविणार्‍या रंगकर्मींची खाण, या खाणीतील एकेक रंगकर्मीने रंगभूमीवर केलेले प्रयोग, रंगभूमीला त्यांनी दिलेले अनमोल योगदान अशा रंगभूमीच्या असंख्य आठवणींना उजाळा देणारा मराठी रंगभूमीचा समृद्ध इतिहास 98 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात उलगडणार आहे. रंगभूमीचा हा समद्ध इतिहास उलगडणार आहे, ठाणेकर नरेंद्र बेडेकर यांच्या साह्याने. 

मराठी रंगभूमीचा समृद्ध इतिहास, रंगभूमीच्या अजरामर ठेव्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी विविध ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून मराठी रंगभूमीचा इतिहास संमेलनात उलगडला जाणार आहे. यासाठी प्रसिद्ध निवेदक व अभ्यासक असलेले नरेंद्र बेडेकर यांनी आपल्या संग्रही असलेला मराठी रंगभूमीचा खजिना नाट्यसंमेलनासाठी खुला करून दिला आहे. बेडेकर यांनी राज्य शासनाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात, तसेच रंगभूमीसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांसाठी काम करताना गेली 15 वर्षे अनेक ध्वनिचित्रफितींची निर्मिती केली आहे. रंगभूमी गाजविणार्‍या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांच्या जीवनगौरव पुरस्कारांच्या निमित्ताने बेडेकर यांनी अनेक कलाकारांच्या मुलाखती, त्यांच्या कार्याचा प्रवास ध्वनिचित्रफितीत गुंफला आहे. रंगभूमीचा हा सगळा अनमोल ठेवा या नाट्यसंमेलनात रसिकांसाठी चित्रफितीच्या माध्यमातून खुला होणार आहे. 

60 तास चालणार्‍या संमेलनात दोन कार्यक्रमांच्यामध्ये कलाकारांच्या तयारीसाठी किंवा रंगमंचीय व्यवस्थेच्या बदलासाठी लागणार्‍या वेळेच्या काळात या चित्रफीती नाट्यरसिकांना दाखविण्यात येणार आहेत. या चित्रफिती केवळ दाखवायच्या म्हणून दाखविण्यात येणार नाहीत, तर दोन कार्यक्रमांच्या आधी, त्या-त्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती विषयानुरूप या चित्रफिती दाखविण्यात येणार असल्याचे नाट्य-दिग्दर्शक मंगेश कदम यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले. या चित्रफिती दाखविण्यासाठी सर्व दालनांमध्ये एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

1960 सालापर्यंतचा  संगीत रंगभूमीचा इतिहास  कृष्ण-धवल छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडणार आहे. याशिवाय 1955 ते 2015 या कालवधीतली राज्य नाट्य स्पर्धेचा इतिहास, या स्पर्धेच्या माध्यमातून रंगभूमीवर झालेले विविध प्रयोग, या स्पर्धेतील कसदार संहिता, अशी राज्य नाट्यस्पर्धेचा आढावा घेणारी दर्जेदार चित्रफीत रसिकांना पहावयास मिळणार आहेत.

सतत नवनवीन प्रयोगांनी मराठी रंगभूमी गाजविणार्‍या विजया मेहता, कमलाकर नाडकर्णी, कमलाकर सोनटक्के यांच्यासारख्या 24 दिग्गज रंगकर्मींच्या कारकिर्दीचा प्रवास रसिकांना पहावयास मिळणार आहे. मो. ग. रांगणेकर, मा. दत्ताराम, प्रभाकर पणशीकर, जयमाला शिलेदार, मामा पेंडसे, रामदास कामत, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, पं. राम मराठे, अरविंद पिळगावकर, रामकृष्ण नाईक, कीर्ती शिलेदार, बाबा पार्सेकर या कलाकारांच्या जीवनप्रवासाची ओळख यानिमित्ताने होणार असल्याचे कदम यांनी सांगितले.