Mon, Nov 19, 2018 10:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयुक्तांची नार्को टेस्ट करा; मनसेची मागणी

आयुक्तांची नार्को टेस्ट करा; मनसेची मागणी

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:41AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी केली आहे. मेहता यांनी शुक्रवारी कमला मिल आगीच्या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आल्याचा आरोप केला होता. मात्र मेहता यांनी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते, त्यामुळे मेहतांची नार्को टेस्ट करण्याची मागणी मनसेने केली आहे. 

आयुक्तांनी स्वतःहून दबाव टाकणार्‍या राजकीय नेत्याचे नाव जाहीर करावे, अन्यथा त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे. मुंबईत पारदर्शी कारभारासाठी निवडून दिलेल्यांनी नागरिकांना खरी हकिकत सांगण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 29 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिल कम्पाऊंडमध्ये पबला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आपल्याला काही राजकीय नेत्यांचे फोन आल्याचे आयुक्तांनी शुक्रवारी सांगितले होते.

मात्र ते नाव आपण जाहीर करू शकत नाही असेदेखील ते म्हणाले होते.   कमला मिल आग प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांना ते सापडू शकलेले नाहीत. त्यामुळे ज्याप्रमाणे महापालिका आयुक्तांवर दबाव आला आहे, त्याप्रमाणे पोलिसांवर देखील दबाव आला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष घालावे अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.