मुंबई : प्रतिनिधी
पायलट उपलब्ध नसल्याने शनिवारी एअर इंडियाच्या मुंबई-अहमदाबाद विमानाने तब्बल सात तास उशिराने उड्डाण केले. त्यामुळे सुमारे 250 प्रवाशांना आख्खी रात्र मुंबई विमानतळावर जागून काढावी लागली. त्यांनी एअर इंडियाच्या लेटलतिफ कारभाराविरोधात आंदोलन केले. अखेर सकाळी विमानाने अहमदाबादच्या दिशेने उड्डाण केले.
एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावरून मध्यरात्री 1.35 वाजता अहमदाबादसाठी उड्डाण भरणार होते. मात्र पायलटने जाण्यास नकार दिल्याने तेथे पर्यायी दुसरा पायलट उपलब्ध नव्हता. त्यामुळे विमान उड्डाण भरू शकले नाही आणि प्रवाशांचा खोळंबा झाला. विमानतळावर प्रवाशांना एअरलाइन्सकडून जेवणाची व इतर सोय करण्यात आली नव्हती. एअर इंडियाच्या या गैरसोयीविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
विमान तब्बल सात तासांनंतर अहमदाबादला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानाला विलंब होणार असल्याची माहितीही प्रवाशांना देण्यात आली नव्हती. काही प्रवाशांनी विमानतळावरच धरणे धरले. तसेच विमान कंपनीच्या कर्मचार्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे तेथे काही तास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटच्या क्षणी प्रवाशांना ही माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा
उद्रेक झाला.