Mon, Jun 17, 2019 19:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथेरानच्या राणीला एसीचा डबा

माथेरानच्या राणीला एसीचा डबा

Published On: Jul 23 2018 1:22AM | Last Updated: Jul 23 2018 1:11AMमुंबई : प्रतिनिधी

माथेरानच्या प्रसिद्ध मिनी ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचा विचार सुरू आहे. नेरळ ते माथेरान अशा दोन तासांच्या प्रवासात उन्हाळ्यात फर्स्ट क्लासच्या डब्यात एसी असावा अशी प्रवाशांची मागणी आहे. त्यादृष्टीने बरेच तांत्रिक बदल करावे लागणार असून आणखी एक डिझेल इंजिन जोडावे लागणार आहे. हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संरक्षित पट्टा असल्याने त्यासाठीही मंजुरी मिळवावी लागणार आहे.

माथेरानची राणी सध्या पावसात अमन लॉज ते माथेरान अशा शटल स्वरूपात धावत असली तरी इतर वेळी ती नेरूळ ते माथेरान माथ्यापर्यंत थेट जाते. या गाडीस सध्या सहा डबे असून पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याने ब़र्‍याच जणांना तिकिटाअभावी नाराज व्हावे लागते. या मिनी ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीचा एक डबा असून त्यात एसी असावा यासाठी रेल्वेचा मेकॅनिकल इंजिनीअर विभाग अभ्यास करीत आहे. प्रथम श्रेणीचा डबा एसी करताना दोन डब्यांच्यामध्ये काही बदल आणि आणखी एक 4 ते 6 केव्हीचे डिझेल इंजिन जोडावे लागणार आहे. हा इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने पर्यावरण खात्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.

ही परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बदल करण्यात येतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. या मिनी ट्रेनला पारदर्शक अशा विस्टाडोम डब्यांची जोड दिल्यास माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेता येईल, असे म्हटले जात होते, परंतु माथेरानमध्ये माथ्यावर हिल स्टेशनवर थंड हवा असली तरी नेरळजवळ खाली पायथ्याशी उन्हाळ्यात मुंबईसारखे प्रचंड ऊन असते.  त्यामुळे पारदर्शक डब्यांमुळे प्रवाशांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे विस्टाडोमसारखी डब्यांची रचना करण्याची योजना मागे पडली आहे.

ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन आठ डब्यांची!

मिनी ट्रेनला प्रचंड मागणी असल्याने तिला आणखी दोन डबे जोडण्यात येणार आहेत. सध्याच्या इंजिनाद्वारेही दोन अतिरिक्त डबे खेचता येणे शक्य आहे. या पावसाळ्यानंतर नव्या मोसमात आठ डब्यांची जोड मिनी ट्रेनला मिळणार आहे. या दोन जादा डब्यांमुळे प्रवाशांची अडचण दूर होईल असे मध्य रेल्वेचे मुख्य मेकॅनिकल इंजिनीअर के.पी. सोमकुंवर यांनी स्पष्ट केले आहे.