Fri, Mar 22, 2019 06:19
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वातानुकूलित लोकलच्या परेवर होणार १२ फेर्‍या

वातानुकूलित लोकलच्या परेवर होणार १२ फेर्‍या

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:24AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

आतुरता लागून राहिलेल्या पश्चिम रेल्वेवरील पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात 12 फेर्‍या चालवण्याचा गांभीर्याने पश्‍चिम रेल्वेचा विचार सुरू आहे. पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल प्रत्यक्षात येण्यासाठी प्रशासनाला बरीच पूर्वतयारी करावी लागत आहे. ती ऐन गर्दीऐवजी गर्दी नसलेल्या वेळेत चालवण्याची आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. लोकल नवीन असल्याने देखभाल-दुरुस्तीसह असंख्य अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला कमी गर्दीच्या वेळेस चार ते सहा फेर्‍या चालवल्यानंतर त्यांची संख्या वाढवावी, असे मत मांडले जात आहे.

रेल्वे मार्गावर सेवा सुरू असताना लोकल नेमकी कुठे उभी करायची ही मोठी अडचण असते. रात्री सेवा बंद झाल्यानंतर लोकल उभ्या करणे सोपे असते. पण सकाळच्या गर्दीत वातानुकूलित लोकलबाबत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वातानुकूलित लोकल सकाळी चालवून पुन्हा सायंकाळी चालवायची असल्यास ती कुठे उभी करायची ही मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेवर साधारणपणे एका लोकलच्या दिवसाला 12 फेर्‍या होतात. त्यात गर्दी आणि गर्दी नसतानाच्या वेळेचाही समावेश असतो. पण वातानुकूलित लोकल चालविताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात, हा मुद्दा लक्षात घेत सुरुवातीला कमी फेर्‍या चालवण्याची सावध भूमिका आहे. ही लोकल चर्चगेट ते बोरिवली आणि विरार मार्गावर चालवण्यात येणार आहे. साधारणपणे सेवा सुरू झाल्यानंतर पहिली लोकल सकाळी 7.54 वाजता बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने सुटेल. परतीच्या मार्गावर शेवटची लोकल बोरिवलीसाठी सायंकाळी 5.49 आणि विरारसाठी सायं. 7.59 वाजताची असेल.