Fri, Apr 26, 2019 01:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कृषीपंपांना आता एचव्हीडीएस योजनेतून कनेक्शन

कृषीपंपांना आता एचव्हीडीएस योजनेतून कनेक्शन

Published On: Apr 17 2018 6:27PM | Last Updated: Apr 17 2018 6:21PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

पैसे भरून प्रलंबित असलेल्या सुमारे २ लाख २४ हजार कृषीपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. २ शेतकऱ्यांना एक रोहित्र या एचव्हीडीएस प्रणालीला आज (मंगळवार दि.१७ एप्रिल) मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंपधारक ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस)मार्फत वीज कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी पैसे भरले पण त्यांना वीज कनेक्शन मिळाले नाही. मात्र आता अशा शेतकऱ्यांना एचव्हीडीएस योजनेतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहेत. 

सध्याच्या पध्दतीनुसार शेतकऱ्यांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्यात येतो. यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कमी दाबाने वीज पुरवठा होतो. तसेच वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात आदींना म‍हावितरणला सामोरे जावे लागते. या सर्व अडचणींवर एचव्हीडीएस योजनेद्वारे मात करता येणे शक्य होणार आहे.

बावनकुळे म्हणाले, उच्चदाब प्रणालीमुळे उच्चदाब वाहिन्यांवरील विद्युत प्रवाह मोठया प्रमाणात कमी होईल. या प्रणालीमुळे वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करता येणार नाही. या योजनेवर 4496.69 कोटी व नवीन उपकेंद्रासाठी लागणारा अंदाजे खर्च 551.44 कोटी अशा एकूण 5048.13 कोटी रूपये इतक्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषीपंपांना वीज जोडणी देणे या योजनेअंतर्गत सन 2018-19 व 2019-20 साठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या तीन वर्षात 4 लाखावर कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यात आले असून महावितरणद्वारे प्रति कनेक्शन 1.5 लाख इतका निधी खर्च करण्यात आला. एचव्हीडीएस योजनेअंतर्गत प्रति कृषीपंप 2 लाख खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या लघुदाब प्रणालीपेक्षा उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदे अधिक आहेत. गेल्या मार्च 2018 पर्यंत 2 हजार 487 कृषी पंपांचे ऊर्जीकरण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. या वर्षात नोव्हेंबर 2017 अखेर पर्यंत 48 हजार 437 कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्यात आले असून 30 हजारावर कृषीपंपांचे वीज कनेक्शनचे काम प्रगतीपथावर आहे.  हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी  महावितरणच्या मुख्यालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार आहे. एचव्हीडीएस योजना लागू झाल्यानंतर लघुदाब व उच्चदाब वितरण प्रणाली या दोन्ही प्रणाली कार्यरत राहतील, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

 

Tags : mumbai, mumbai news, Agri pump connections,  HVDS scheme, Chandrashekhar Bawankule,