Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इस्त्रायलच्या पंतप्रधानांविरोधात मुंबईत निदर्शने

इस्त्रायलच्या पंतप्रधानांविरोधात मुंबईत निदर्शने

Published On: Jan 19 2018 2:11AM | Last Updated: Jan 19 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी 

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या मुंबई दौर्‍याविरोधात मुंबईतील 111 मौलानांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले व नेतन्याहू यांचा निषेध केला. नेतान्याहू गो बॅक अशा घोषणा देत व बॅनर फडकावत या मौलानांनी निषेध केला. मौलानांनी त्यांच्या पादत्राणांवर इस्त्राईलच्या राष्ट्रध्वजाचे छायाचित्र लावून निषेध केला. जामिया काद्रिया अश्रफियाचे प्रमुख  मौलाना मोईनुद्दीन अश्रफ व रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी यांंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने मदनपुरा येथील बडी मशीद ते ताज हॉटेस मार्गावर निदर्शने करण्यात आली. 

यावेळी सुन्नी जमातचे मौलाना खलील नुरी, इब्राहिम तायी, मौलाना अमानुल्लाह, आसिफ सरदार यांसह इतर मौलानांनी यात सहभाग घेतला. रझा अकादमीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नेतन्याहू यांच्या दौर्‍याचे आयोजन केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. भारताने सातत्याने पॅलेस्टाईनला पाठिंबा देऊन इस्त्रायलच्या धोरणांना विरोध केला आहे, मात्र विद्यमान सरकार त्याविरोधी भूमिका घेत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नेतन्याहू यांनी लहान बालके, स्त्रिया यांच्यासह निष्पाप पॅलेस्टाईन नागरिकांचे शिरकाण केले आहे, त्यांना भारतात येण्याचे निमंत्रण देणे चुकीचे आहे. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या व त्यांना बळ देणार्‍या नेतान्याहू सारख्या नेत्यांना भारत सरकारने निमंत्रण देणे चुकीचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले. भारताने सातत्याने पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी भूमिका घेतली  असून नेतन्याहू यांच्या दौर्‍यामुळे पॅलेस्टाईन सोबतच्या संबंधांमध्ये बिघाड होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. 

सपाचे गोवंडीत आंदोलन 

समाजवादी पक्षातर्फे नेतान्याहू विरोधी आंदोलन करण्यात आले. गोवंडीत विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी नेतन्याहू यांच्या दौर्‍याविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पॅलेस्टाईन नागरिकांवर हल्ला करणार्‍या इस्त्राईलच्या पंतप्रधानांना भारतात बोलावणे चुकीचे असून भारताने पॅलेस्टाईनविरोधी भूमिका घेऊन इस्त्रायलला पाठिंबा देण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष गयासुद्दीन शेख, नगरसेवक अख्तर कुरैशी व इतर उपस्थित होते.