Sat, Nov 17, 2018 10:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 31 बिल्डर्सविरोधात ग्राहक पंचायतीची महारेराकडे तक्रार

31 बिल्डर्सविरोधात ग्राहक पंचायतीची महारेराकडे तक्रार

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी 

महारेरा कायद्याचे उल्लंघन करत जाहिराती प्रसिद्ध करणार्‍या 31 विकासकांची मुंबई ग्राहक पंचायतीने महारेराकडे तक्रार केली आहे. या 31 विकासकांविरोधात शुक्रवारी तक्रार नोंदवण्यात आली आहे.  

महारेराचा नोंदणी क्रमांक आणि महारेराच्या वेबसाईटची माहिती प्रत्येक विकासकाला जाहिरातीमध्ये नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र काही विकासक या नियमांना न जुमानता राजरोसपणे नियमांचे उल्लंघन करत गृहप्रकल्पाच्या जाहिराती प्रसिद्ध करत आहेत. अशा 31 बड्या विकासकांविरोधात महारेराकडे आम्ही तक्रार केली असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले. महारेराचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि वेबसाईट जाहिरातीमध्ये देणे बंधनकारक आहे. हे जाहिरातीमध्ये नमूद न करताच जाहिराती करण्यात येतात. तसेच गृहप्रकल्पातील सोईसुविधांमध्ये बदल करण्याचे अधिकार विकासकाकडे असल्याचे नमूद करण्यात येते, हे कायद्याच्या पळवाटा शोधण्यासारखे असून दंडनीय अपराध असल्याचेही देशपांडे यावेळी म्हणाले. यामुळे आम्ही या 31 विकासकांच्या तक्रारी महारेराकडे केल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

ग्राहक पंचायतीने गेल्या आठवड्यात अशाच सात विकासकांविरोधात महारेराकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महारेराने या सातही विकासकाना दोषी ठरवत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. सहा विकासकांना प्रत्येकी दोन लाख तर एका विकासकाला 12 लाखांचा दंड महारेराने ठोठावलेला आहे. दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये बड्या विकासकांचाही समावेश आहे. विकासक महारेराचे उल्लंघन करत आहेत का ? ग्राहकांची फसवणूक करत आहेत का ? यावर बारकाईने लक्ष ठेवणार्‍या ग्राहक पंचायतीने आता आणखी आणखी 31 विकासक शोधून काढले आहेत.

यामध्ये चौतन्य सृष्टी, साई भूमी, अरिहंत, स्ट्रॉबेरी पार्क, सॉफ्ट कॉर्नर, मेट्रो वन, कर्म इन्फ्रा स्ट्रक्‍चर, अशर, वाधवा ग्रुप, सुमित ग्रुप अशा इतर विकासकांचा यामध्ये समावेश आहे. महारेराची नोंदणी न करताच प्रकल्पाची जाहिरात करणे, नोंदणी क्रमांक जाहिरातीत नमूद न करणे, महारेराच्या वेबसाईटची माहिती न देणे, अशा नियमांचे उल्लंघन या विकासकांनी केले आहे. या विकासकांची तक्रार मुंबई ग्राहक पंचायतीने महारेराकडे  करण्यात आली असून आता महारेरा या विकासकांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.