डोंबिवली : वार्ताहर
शनिवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीवर चोवीस तास उलटूनही अग्निशामक दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. उन्हाळा सुरू झाला की आधारवाडीच्या डम्पिंगला आगी लागतात. आगी लावतात, की लागल्या जातात हा प्रशासनाच्या संशोधनाचा विषय असला तरी त्याचे स्थानिकांना काहीही देणेघेणे नाही. एकीकडे डम्पिंगच्या दुर्गंधीने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे आगीच्या धुरामुळे होणारा कोंडमारा या परिघातील रहिवाशांना नकोसा झाला आणि हा त्रास असह्य होऊन रस्त्यावर उतरलेल्या कल्याणकरांना पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या. कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी घटनास्थळी भेट देत सलग दुसर्या दिवशी धुमसणार्या या आगीची माहिती घेतली. त्याच वेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कचरा कारभाराविरुद्ध लोक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ उडाली. संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये महिलांचाही समावेश होता. त्यांनी जुना आग्रा महामार्ग बंद पाडून केडीएमसी प्रशासनाचा निषेध केला. अचानक उद्भवलेल्या या आंदोलनात नागरिकांनी केडीएमसी हाय हाय, आयुक्त हाय हाय, आमदार-खासदार हाय हायच्या जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. आंदोलनात हस्तक्षेप करणार्या पोलिसांशी संतप्त नागरिकांची बाचाबाची झाली. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊन कायदा, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांवर सौम्य लाठीमार केला.
दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली आणि आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचे टँकर, अशा 50 ते 60 गाड्यांमधील पाण्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. रविवारी सकाळी पुन्हा या आगीचा भडका उडाल्याचे कळताच समोरच असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धावल्या. परंतु खाडीकिनारी सुटलेल्या वार्यामुळे ही आग पसरत गेली. आगीने रौद्र रूप धारण करताच आधारवाडी, कोळसेवाडीच्या ड प्रभागातील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. शनिवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीवर दुसरा दिवस उलटूनही अद्याप यश आलेले नाही. आग डम्पिंगमध्ये खोलवर गेल्याने ती धुमसत असून, धुराचे लोट बाहेर पडणे सुरूच आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत डम्पिंगवरील कचरा पेटण्याचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसांतच मोठ्या प्रमाणावर डम्पिंगला आगी लागल्या होत्या. यासंदर्भात प्रशासनाने आजतागायत ठोस उपाययोजना न केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही हे सत्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. उन्हात कचरा तापतो. या कचर्यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेटतो. परिणामी आग लागून धुराचे प्रचंड प्रमाणात लोट उठतात. आग लागताच मोठ्या प्रमाणावर वाहणार्या वार्यामुळे आगीचा धूर वार्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो. आगीचे प्रमाण जास्त असेल तर धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, गौरीपाडा, पौर्णिमा चौक, शिवाजी चौकपर्यंत पसरत जातात. त्यामुळे तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते.
विद्यमान महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी संयुक्त दौरा करून डम्पिंगची पाहणी केली होती. डम्पिंग पूर्णपणे बंद होण्यासाठी लागणारा दीड वर्षाचा कालावधी पाहता बायोगॅसद्वारे कचर्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्या वेळी केला होता. तथापी आजतागायत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाय म्हणून डम्पिंगमध्ये पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याबाबतची निविदा प्रक्रियाही पार पडली होती. मात्र त्यालाही खो मिळाला आणि ही योजनाही बारगळली.