Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील लढ्याची दिशा आज ठरणार

पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 01 2018 9:16PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रीय किसान महासंघाने शुक्रवार एक जूनपासून देशभर 10 दिवसांचे गाव बंद आंदोलन पुकारले असून, शहरात येणारा भाजीपाला, दूध, फळे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखण्याचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये राज्यातील विविध ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून, त्यामुळे शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यात पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनालाही एक वर्ष पूर्ण झाली असून, भारतीय किसान सभा आणि अन्य समविचारी शेतकरी संघटनाही  शनिवारी आंदोलनाची घोषणा करणार आहेत.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची प्रमुख मागणी घेऊन राष्ट्रीय किसान महासंघ, किसान एकता आदी संघटनांनी देशव्यापी दहा दिवसांच्या संपाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रमुख शेतकरी संघटना सहभागी झालेल्या नसल्याने त्याचा फारसा परिणाम पहिल्या दिवशी दिसून आला नाही. शिर्डीत पुणे-नाशिक महामार्गावर दुधाचा टँकर रिकामा करण्यात आला. संगमनेर तालुक्यात शेतकर्‍यांनी सरकारी धोरणाचा तीव्र निषेध केला. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादन खर्चासह 50 टक्के हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली. येवला तालुक्यातील धुळगाव व पाटोदा येथील शेतकर्‍यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.

राष्ट्रीय किसान महासंघाने देशव्यापी आंदोलन पुकारले असताना भारतीय किसान सभा, प्रहार आणि अन्य समविचारी संघटनांनी एकत्र येत राज्यातील शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याने आणि शेतकर्‍यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित राहिल्याने पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत होणार्‍या बैठकीनंतर त्याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे.

या आंदोलनाची सुरुवात म्हणून किसान सभेने शुक्रवारी राज्यभर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलने केली. 22 जिल्ह्यात झालेल्या या आंदोलनामध्ये अकोला येथे भारतीय किसान सभेचे नेते कॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाचे गेट तोडून शेतकरी आत घुसले. याशिवाय अहमदनगर, सोलापूर, परभणी, बीड, अमरावती, वर्धा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतही आंदोलने करण्यात आली. प्रहार संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन केले. नागरिकांना दुधाचे मोफत वाटप करतानाच इंदापूर ˆ बारामती महामार्गावर दुधाचा टँकर रिकामा केला.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पालेभाज्या घेऊन जाणार्‍या दोन गाड्या अडवण्यात आल्या. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही उलाढाल ठप्प होती. मात्र, ज्या नाशिकमधून गेल्यावर्षी शेतकरी आंदोलन पेटले, त्या नाशिक बाजार समितीत व्यवहार व्यवस्थित सुरू होते. ज्या पुणतांबा येथे शेतकरी आंदोलनाची सुरुवात झाली होती, त्या पुणतांब्यात मागण्या प्रलंबित राहिल्याने शेतकर्‍यांनी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध केला.

राष्ट्रीय किसान महासंघाच्या संपात आम्ही सहभागी नसलो, तरी आमचा विरोध नाही. आम्ही राज्यात स्वतंत्र आंदोलन करणार असून, ते देशव्यापी आंदोलनाला पूरकच असेल, असे डॉ. अजित नवले म्हणाले. शेतमालाची नासाडी व्हावी, शेतकर्‍यांचे नुकसान व्हावे, असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. एक वर्षानंतरही शेतमालाला हमीभाव, दुधाला वाजवी दर देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ मागण्यांवर निर्णय घ्यावेत. अन्यथा आम्हालाही शेतमालाचा पुरवठा रोखावा लागेल, असेही नवले म्हणाले.

संघटनांमध्ये फूट

दरम्यान, गेल्यावर्षी शेतकरी आंदोलनात किसान सभेसह खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील आदी शेतकरी नेते सहभागी झाले होते. मात्र, भारतीय किसान सभेच्या उद्याच्या बैठकीला शेट्टी व रघुनाथदादा हजर राहणार नसल्याचे कळते. आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना, शेकाप आणि अन्य शेतकरी संघटना उद्या बैठकीला हजर राहणार आहेत. रघुनाथदादा पाटील यांनी शेतकर्‍यांचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी 248 मतदार संघात उमेदवार उभे करण्याचा प्रस्ताव ठेवला असून, तो किसान सभेने नाकारला आहे. राजू शेट्टी यांनीही या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सहा राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद

हरियाणा, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आणि केरळमध्येही शेतकर्‍यांच्या संपाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी फळे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून दिले. राज्यांमधील प्रमुख शहरांना जाणारी फळे, भाजीपालाही रोखून धरण्यात आला. राज्य महामार्ग टायर जाळून बंद करण्यात आले होते. मध्य प्रदेशात 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.