Sat, Aug 24, 2019 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निकालानंतर पोलिसांच्या सुट्ट्या, रजा सुरू

निकालानंतर पोलिसांच्या सुट्ट्या, रजा सुरू

Published On: May 27 2019 1:34AM | Last Updated: May 27 2019 1:34AM
मुंबई : प्रतिनिधी

गेली अडीच महिने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पोलिसांना सुट्ट्या व रजा बंद होत्या. दोन दिवसांपूर्वी निकाल झाल्यानंतर सुट्टी व रजा पुन्हा सुरू  झाल्याने पोलीस दलाला दिलासा मिळाला आहे.

10 मार्चला निवडणुकीच्या आचारसंहितेला सुरुवात झाली आणि  निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान आणि निकाल या संपूर्ण काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस दलाने यशस्वी पार पाडली.   पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे कायदा व सुव्यवस्था हाताळली. त्यामुळे उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्‍चिम, दक्षिण मध्य मुंबई व दक्षिण मुुंबई अशा सहा लोकसभा मतदारसंघांत  शांततेत मतदान झाले. गुरुवारी (दि. 23) रात्री उशिरापर्यंत मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर शुक्रवार (दि.24) पासून अनेक अधिकारी व कर्मचारी सुट्टी व रजेवर गेले असल्याचे पोलीस प्रशासनातून सांगण्यात आले.

आता बदल्यांची प्रतीक्षा

दुसरीकडे अनेक पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. शुक्रवारी (दि.24) मुंबई पोलीस दलातील 20 वरिष्ठ  पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या, तर काही जणांना पदोन्नती मिळाल्या.

दरवर्षी  पोलीस प्रशासनाचा बदल्याचा काळ हा एप्रिल-मे हाच असतो. मात्र; यंदा लोकसभेची आचारसंहिता असल्याने या महिन्यात बदल्या झाल्या नाहीत. परंतु, लोकसभा निकालानंतर दुसर्‍या दिवशीच बदल्या व बढत्यांचे आदेश निघाले. ज्या पोलीस  ठाण्यात दोन वर्षे सेवा पूर्ण झालेले अधिकारी  आणि ज्या पोलीस कर्मचार्‍यांची सेवा पाच वर्षे पूर्ण झाल्या आहेत. त्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पण; अनेक अधिकारी-कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
 अद्यापही मे महिना संपण्यास आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील आठवडयात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.