Thu, May 28, 2020 16:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निकालानंतर मंत्रिमंडळात फेरबदल

निकालानंतर मंत्रिमंडळात फेरबदल

Published On: May 16 2019 2:08AM | Last Updated: May 16 2019 1:55AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या जागेवर नव्या चेहर्‍याची वर्णी लागणार असून, महसूल आणि कृषी या दोन खत्यांवर नवे मंत्री शपथ घेतील, असे खात्रीलायकरीत्या समजते.

मतमोजणी आणि निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा रंगू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांनी मतदारसंघात निवडणूक काळात आपला परफॉर्मन्स दिलेला नाही, अशा मंडळींना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे त्या जागेवर निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून महसूल खाते काढून विखे यांना मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेले आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेले कृषी खाते विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर आणि मराठवाड्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी मंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे.