Tue, Apr 23, 2019 08:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गृह राज्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर अखेर मराठा ठिय्या आंदोलन मागे

गृह राज्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर अखेर मराठा ठिय्या आंदोलन मागे

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:33AMमुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या समन्वयाने व संवादाने मान्य होण्यासारख्या आहेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी पाठवले आहे, असे सांगत महाराष्ट्र बंदमध्ये सामील झालेल्या आंदोलनात पोलिसांवर हल्ला किंवा मारहाणीचे थेट पुरावे अथवा व्हिडीओ क्‍लिप असतील, संविधान व कायद्याने अक्षेपार्ह गोष्टी, किरकोळ तोडफोड असेल तर असे गुन्हे वगळून इतर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत शासन स्तरावरुन आदेश देण्यात येणार आहेत, असे आश्‍वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्यानंतर मराठा समाजाच्या रणरागिणींचे सलग तेरा दिवस सुरू ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

ज्या मराठा बांधवांच्या आंदोलनाशी संबंधित हद्दपारीच्या नोटीसदेखील रद्द करण्यात येणार आहेत. कोंबिंग ऑपरेशन सुरु असेल तर ते त्वरीत थांबवले जाईल. त्या समाजाच्या न्याय प्रविष्ठ मागण्या सोडून इतरही मागण्या शासन स्तरावरुन सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही डॉ.रणजीत पाटील यांनी आंदोलनास बसलेल्या महिलांना दिली. मराठा महिलांनी आझाद मैदानात सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास डॉ. पाटील यांनी भेट देवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या महिला कार्यकर्त्यांशी चार्चा करताना शासनाच्या वतीने अनेक आश्‍वासने दिली.

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ फक्त मराठा समाजासाठीच सिमित करण्यासाठी आवश्यक ते आदेश शासन स्तरावर दिले जाणार आहेत. मी स्वत: या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही असणार आहे. जास्तीत जास्त मराठा युवकांसाठी कार्यशाळांची गरज आहे. अमरावती विभागात पाच जिल्ह्यात मराठा मुलांसाठी वसतीगृह व सरकारी योजना होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. त्याशिवाय मंत्री पदाला न्याय दिल्यासारखे वाटणार नाही, असे पाटील म्हणाले.