होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांनी दंड केल्याने दुचाकीस्वाराने डोके घेतले आपटून

पोलिसांनी दंड केल्याने दुचाकीस्वाराने डोके घेतले आपटून

Published On: May 05 2018 1:21AM | Last Updated: May 05 2018 1:14AM



ठाणे : प्रतिनिधी

हेल्मेट नसल्यामुळे वाहतूक नियमांचा भंग केल्याची कारवाई करत पोलिसांनी दंडाची पावती दिली म्हणून एका 25 वर्षीय दुचाकीस्वाराने संतप्त होत लोखंडी गेटवर स्वतःचेच डोके आदळून घेतल्याची घटना तीन हात नाका येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात घडली. तर डोके फोडून घेतलेल्या तरुणाच्या मित्राने पोलिसांच्या कार्यालयात घुसून सरकारी कार्यालयातील मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी तिघांवर नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंधेरी येथे राहणारा नजीर अहमद शेख (25) हा आपल्या मित्रासह ठाण्यात दुचाकीवरून आला होता. त्याच्याकडे हेल्मेट नसल्याने व दुचाकीच्या पुढील नंबरप्लेट तुटलेली असल्याने वाहतूक पोलीस कुंडलिक काकडे यांनी त्यास दंडाची पावती दिली. या गोष्टीचा राग येवून नजीरच्या दुचाकीवर मागे बसलेल्या त्याच्या मित्राने स्वतःचेच डोके लोखंडी गेटवर आदळून घेत स्वतःस जखमी करून घेतले. तर नजीर याने वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात घुसून जोरजोरात ओरडून शिवीगाळ करीत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. 

दरम्यान, या दोघांनी त्यांचा वाहतूक सेनेचा अध्यक्ष असलेल्या मित्राच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा आरोप वाहतूक पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसात तिघांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा 2 मे रोजी रात्री दाखल केला आहे.

Tags : Mumbai, After, being, fined, the police, two wheeler, took,  head