Mon, Jul 22, 2019 00:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर एसटीची तिकीट दरवाढ झालीच!

अखेर एसटीची तिकीट दरवाढ झालीच!

Published On: Jun 16 2018 1:40AM | Last Updated: Jun 16 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) गुरुवारी 14 जूनच्या मध्यरात्री होणारी 18 टक्क्यांची भाडेवाढ लांबल्याने एसटी प्रवाशांना दिलासा मिळाला होता. पण अवघ्या काही तासांतच प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे. एसटी प्राधिकरणाने शुक्रवारी दुपारी 18 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून शुक्रवारी 15 जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. आता शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच भाडेवाढ लागू होईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणास दरवाढ लागू करण्याच्या तीन दिवस आधी महामंडळाने कळवणे आवश्यक होते. प्राधिकरणास दरवाढीच्या निर्णयाची आणि दरसूत्राची माहिती एसटी महामंडळाकडून उशिरा गेल्यामुळे ही दरवाढ लांबली असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. एसटी महामंडळाने तीन दिवस आधी दरवाढीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला होता. अखेर नियमांच्या आधारे एसटीच्या दरवाढीचा निर्णय अमलात येणार आहे. वेतन कराराच्या मुद्द्यावर कामगारांनी अचानक केलेल्या काम बंद आंदोलनामुळे प्राधिकरणाकडे पत्र पाठवण्यास उशीर झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. अखेर शुक्रवार मध्यरात्रीपासून एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. 

इंधनाचे वाढलेले दर, वेतन करार आदी कारणांमुळे ही दरवाढ करण्यात आली असल्याचे एसटी महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.एसटीच्या नव्या दरवाढीनंतर तिकिटाचे दर पाच रुपयांच्या पटीत करण्यात आले आहे. सात रुपयांचे तिकीट दर पाच रुपये असतील. आठ रुपयांचे तिकीटाचे दर दहा रुपये असणार आहे. तर बारा रुपयांचे तिकीट दर आता दहा रुपये याप्रमाणे असणार आहेत. यामुळे प्रवासी व वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांच्या कारणांवरुन होणार वाद थांबतील अशी महामंडळाला अपेक्षा आहे.

भाडेवाढीचा आमच्या पगारवाढीशी संबंध काय?

एसटीची प्रवासी भाडेवाढ करताना, वाढणारे डिझेल दर आणि नुकतीच कर्मचार्‍यांना दिलेली पगारवाढ ही कारणे परिवहन मंडळाकडून सांगण्यात येत आहेत. मात्र विविध संघटनांच्या एसटी कर्मचार्‍यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करुन स्पष्ट सांगितले आहे, की आमच्या पगारवाढीचा प्रवासी भाडेवाढीशी काहीही संबंध नाही.