Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा!

ललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा!

Published On: May 29 2018 12:19PM | Last Updated: May 29 2018 12:22PMमुंबई : प्रतिनिधी

सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर खाकी वर्दीवर ललितकुमार साळवे या नावाचा टॅग लावून काम करण्याची उत्सुकता ललित साळवे याला लागली आहे. कालपर्यंत आम्ही जिला दीदी म्हणायचो त्याला आता दादा म्हणून बोलवणार असल्याचे कुतूहल त्याचा भाऊ दयानंद साळवे याला आहे.

शस्त्रक्रियेनंतर ललितला खूप वेदना होत आहेत. पण कोणी ललित म्हणून हाक दिली की वेदना कमी होतात. मी आता समाधानी असून गेल्या 29 वर्षाचा माझा संघर्ष संपला असल्याचे ललितने सांगितले. ललितला बेडवरून उठण्यासाठी व नातेवाईकांना भेटण्यासाठीही डॉक्टरांनी मनाई केली आहे. खूप बोलल्यामुळे त्याच्या स्वरयंत्रावर ताण येऊन जननमार्गातील वेदना वाढण्याची शक्यता असल्याने सेंट जॉर्जे रुग्णालयातील डॉक्टर त्याची खूप काळजी घेत आहेत.

ललित माझ्या मेहुणीचा मुलगा आहे. लहानपणी अनेकदा तो आमच्या घरी येत असे, मात्र तेव्हा मुलगी म्हणून आम्ही समजत असू. तो मुलगा असल्याचे कधीच जाणवले नाही. मात्र तो जसजसा वयाने वाढत गेला तसे त्याला ते बदल जाणवू लागले. हे सारे समजून घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आम्हालाही खूप वेळ लागला, असे त्याचे काका भरत बनसोडे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

रुग्णालयात ललितची काळजी घेणार्‍या त्याच्या आई केशरबाई साळवे यांना विचारले असता, ललित की ललिता या प्रश्‍नाचे उत्तर तो लहान असताना आम्हाला मिळाले नाही. जसजसे त्याचे वय वाढत गेले. तसतसे त्याच्या मनातील घालमेल वाढत होती. मात्र हे समजयाला मला वेळच मिळाला नाही. मीही गोंधळून गेले होते, हे सांगताना केशराबाई साळवे यांना अश्रू अनावर झाले. ललित मला एक नवीन मुलगा म्हणून झाल्याचा आनंद आहे. मात्र शस्त्रक्रियेमुळे त्याला होत असलेल्या वेदना यामुळे आई म्हणून जीवाची घालमेल होत असल्याचे त्यांनी सांगितले.  

कुटुंबात आनंदाचे वातावरण

ललित, त्याची आई, काका, भाऊ हे सर्वजण त्याच्या संघर्षाच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शस्त्रक्रियेनंतर बर्‍याच गोष्टीत बदल होणार आहे. पूर्वी दोन भाऊ आणि दोन बहिणी असणारे आता तीन भाऊ व एक बहिण असे होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण असल्याचे ललितचा भाऊ सदानंद साळवे याने सांगितले. आम्ही सर्व भावंडे दीदी म्हणून बोलत असू मात्र आता दादा म्हणून हाक मारणार, असे तो म्हणाला.

साधारणपणे दोन आठवडे ललितवर रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत. सध्या त्याला द्रवरुप आहार दिला जात आहे. त्याच्या मांडीच्या त्वचेपासून त्याचा लघवी उत्सर्जन अवयव तयार केला असून चार-पाच महिन्यानंतर फॉलोअपसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. - डॉ. मधुकर जी. गायकवाड, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय