Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात होणार 'या' राजकीय हालचाली

गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात होणार 'या' राजकीय हालचाली

Published On: Dec 17 2017 11:29AM | Last Updated: Dec 17 2017 11:29AM

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल राजकीय घडामोडींच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे. हा निकाल काही राजकीय नेत्यांना नेमकी कोणती राजकीय भूमिका घ्यायची, याचे मार्गदर्शन करणारा ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने परस्परांविरुद्ध निवडणुका लढविल्या. त्यावेळी सत्तेवर असलेल्या शिवसेना- भाजप युतीला जनतेने नाकारले. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही, असा कौल मतदारांनी दिला. अखेर जनादेश हा सरकारच्या विरोधात असल्याचे सांगत परस्परांविरोधी लढलेले दोन्ही पक्ष एकत्र आले व काँग्रेसचा मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, अशी राजकीय तडजोड करण्यात आली.

तशीच राजकीय परिस्थिती 2014 च्या निवडणुकीत तयार झाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्थिक पॉवर हाऊस असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या संचालकांना घरचा रस्ता दाखवत तेथे प्रशासक मंडळाची नेमणूक केली. त्यामुळे बरीच धुसफूस सुरू झाली. नाराजीचे नाट्य रंगले. राजकीय भाषणांच्या आडून धमकीवजा इशारेही देण्यात आले. मात्र, याकडे चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. निवडणुकीला काही दिवस राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने घटस्फोट घेत सरकारमधून बाहेर पडून स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला. 1999 नंतर प्रथमच या दोन्ही काँग्रेस शड्डू ठोकून परस्परांसमोर उभ्या ठाकल्या. 15 वर्षे राज्यात दोन्ही काँग्रेसचे सरकार असल्यामुळे निर्माण झालेली नाराजी व मोदी लाट यामध्ये अनेक भल्याभल्या राजकारण्यांचे इमले ढासळले.

तीन वर्षे राजकीय वनवास सोसल्यानंतर विरोधकांच्या हाती शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लागला व या मुद्द्यावर रान उठवत त्यांनी नागपूरच्या अधिवेशनावर संयुक्त मोर्चा काढून हल्लाबोल केला. मोर्चा यशस्वी झाला व तेथूनच आगामी निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढविणार, याची चर्चा सुरू झाली आहे. 

गेल्या निवडणुकीत जेथे काँग्रेसचा पराभव करून राष्ट्रवादीचा तसेच राष्ट्रवादीचा पराभव करून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे तेथे उमेदवारी कोणाला, हा प्रश्‍न जेव्हा समोर येईल त्यावेळी काय, याचे उत्तर आजतरी कोणाकडे नाही. पण, सर्वसाधारणपणे विद्यमान उमेदवार कायम ठेवून जागावाटपाची बोलणी सुरू केली जातात. त्यामुळे असा राजकीय पेचप्रसंग ज्या-ज्या ठिकाणी आहे, तेथील पराभूत उमेदवारांसाठी भाजप हा पर्याय आहे. कोणतीही राजकीय भूमिका घेण्यापूर्वी त्यांनी गुजरातच्या निकालापर्यंत वाट पाहून आपली राजकीय भूमिका निश्‍चित करण्याचे ठरविले असल्याचे चर्चा आहे.