Mon, Jun 17, 2019 14:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांचा कार्यभार मंत्रिगटाकडे

मुख्यमंत्र्यांचा कार्यभार मंत्रिगटाकडे

Published On: Jun 10 2018 1:11PM | Last Updated: Jun 10 2018 9:00PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आठवडाभराच्या परदेश दौर्‍यावर गेले असून, तोपर्यंत त्यांनी आपला कार्यभार मंत्रिगटाकडे सोपविला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन या तीन मंत्र्यांचा या मंत्रिगटामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री परत येईपर्यंत राज्यात काही तातडीने निर्णय घ्यायचा झाल्यास, हा मंत्रिगट एकत्रितरीत्या निर्णय घेणार आहे.

राज्यात परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेेश दौरा आखला आहे. त्यांच्या या दौर्‍यात काही महत्त्वाचे सामंजस्य करार होणार असून, काही प्रमुख अधिकार्‍यांसह ते दौर्‍यासाठी रवाना झाले आहेत. ते 16 जूनला परतणार असून, तोपर्यंत राज्यात काही तातडीने निर्णय घेण्याची वेळ आल्यास, ती जबाबदारी त्यांनी तीन सदस्यीय मंत्रिगटाकडे सोपविली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आणि आपल्या विश्‍वासू मंत्र्यांचा समावेश केला आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते आहेत. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेले कृषी आणि फलोत्पादन खात्याचा अतिरिक्‍त कार्यभार मुख्यमंत्र्यांनी पाटील यांच्याकडे सोपविला आहे. आपल्या अनुपस्थितीत निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिगटातही त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा समावेश केला आहे. राज्यात सध्या खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होत आहे. मान्सूनला सुरुवात झाली असून, राज्याच्या काही भागात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यातच शेतकरी आंदोलनही सुरू आहे. त्यामुळे मंत्रिगटाला या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही प्रसंग उद्भवल्यास या मंत्र्यांनी एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र, कोणत्याही मंत्र्याला प्रभारी मुख्यमंत्री करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी परदेश दौर्‍यावर जातानाही प्रभारी मुख्यमंत्री नेमण्याऐवजी मंत्रिगटच नेमला होता.

सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन हे देखील मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू मंत्री मानले जातात. त्यांचाही या मंत्रिगटात समावेश करण्यात आला आहे. या तीनही मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कारभार सक्षमपणे सांभाळताना आपल्या परिसरात पक्षवाढीसाठी मेहनत घेतली आहे. पक्षातील अन्य ज्येष्ठ मंत्र्यांचा मात्र या मंत्रिगटात समावेश करण्यात आलेला नाही की शिवसेनेच्या कोणा मंत्र्यालाही संधी देण्यात आलेली नाही.