Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर बेपत्ता शर्मा कुटुंबाचे गूढ उकलले

अखेर बेपत्ता शर्मा कुटुंबाचे गूढ उकलले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

विरार : वार्ताहर

विश्वास, अथक परिश्रम आणि पाठपुरावा यांच्या सहाय्याने एका सूनेने सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या कुटुंबियांना शोधून काढले. तुझा पती आता येणारच नाही, असे सुनावतानाच, शोध सुरू  असल्याचे आश्वासन देणार्‍या पोलिसांवर विसंबून न राहता शर्मा  कुटुंबियांची सून संगीता हिने आपल्या पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. माझा पती परत येणारच हा तिचा विश्वास त्याला  तिच्यापर्यंत घेऊन आला आणि त्याच्यामार्फत इतर  सदस्यांचा ठावठिकाणा लागला. तिच्या कुटुंबियांनी लोकांचे देणे त्वरित देणे शक्य नसल्याने कुटंबासह घर सोडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

विरार पश्चिमेत ग्लोबल सिटीमध्ये वरुण शर्मा पत्नी, आई व भावासह राहायचे तर त्यांचे काका सुरेंद्र शर्मा हे विरार पूर्वे त आपल्या कुटुंबांसह राहतात. जून 2017 मध्ये वरुणची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी अमरावती येथे गेली होती. तिने मुलीला जन्म दिल्यानंतर वरुण त्या दोघींना भेटून आला आणि ऑक्टोबर 2017 ला वरुण, त्याची आई, भाऊ, काका, काकी, चुलत बहिण असे सर्व सहाजण बेपत्ता झाले. वरुणचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने संगीता शर्मा यांनी विरार पोलीस ठाण्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यांनी तिला अर्नाळा सागरी पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितले. पोलीस तिच्या घरी गेले तेव्हा दाराला कुलूप होते. त्यांनी शेजार्‍यांकडे चौकशी केली असता, ते दिवसकार्यासाठी नाशिकला गेल्याचे कळले. दिवसकार्यासाठी गेले तर सर्वांचे मोबाईल बंद का? असा प्रश्न संगीताला पडला आणि तिने चुलत सासरे सुरेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क करण्याची विनंती पोलिसांना केली.  चुलत सासर्‍यांचे कुटुंबही घरी नसल्याचे कळले. तेव्हा शर्मा कुटुंबीस बेपत्ता झाल्याचे  उघडकीस आले.

नुकताच मुलीला जन्म दिल्याने संगीता विरारपर्यंत येऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने मोबाईलच्या माध्यमातून पोलिसांकडे पाठपुरावा सुरू केला. पोलीस  तपास गती घेत नसल्याचे पाहून अखेर ती तान्ह्या मुलीला आईकडे सोपवून एक दिवसासाठी विरारला आली. पोलिसांसह ती घरी गेली असता घरातील देव्हार्‍या व्यतिरिक्त सर्व सामान तसेच होते. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले. हा पास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे द्यावा, अशी मागणी संगीताने केली. मात्र, गुन्हे अन्वेषण शाखेचा तपासही संथ गतीने सुरू होता. संगीताला धीर देण्याऐवजी पोलीस वरुण आता येणारच नाही, तुम्ही ऑनलाईन ओळखीवर लग्न केलं आहेत, त्याने असे अनेकांना फसवले असेल,  तुम्ही त्याचा विचार सोडा, असे सल्ले देऊ लागल्याने त्यामुळे आधीच घाबरलेली संगीता हादरून गेली. आपले आणि आपल्या मुलीचे भवितव्य काय या विचाराने ती चिंताग्रस्त झाली आणि तिने आपल्या परिने पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, एक दिवस वरुणने फेसबुकच्या माध्यमातून संगीताशी संपर्क केला. तिने ही माहिती पोलिसांना दिली. वरुणने तिला भेटायला येत असल्याचे सांगितले. तिने ही माहितीही पोलिसांना दिली. वरुण, संगीता आणि मुलीला भेटायला आला, 
तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेतली असता घरातील इतर सदस्य उज्जैनमध्ये असल्याचे समोर आले. 

आणि बेपत्ता शर्मा कुटुंबाचे गूढ उकलल 

वरुणचे काका सुरेंद्र यांनी काही जणांशी सहा लाखांपर्यंत व्यवहार केला होता. त्यांचे ते पैसे मुदतीत परत देणे त्यांना शक्य न झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह वरुण, त्याची आई आणि भावाला बरोबर घेऊन घर सोडले. मात्र, त्यांनी त्यावेळी याची माहिती कोणालाही दिली नाही. तसेच मोबाईलसह संपर्कचे इतर माध्यमही तोडून टाकले. त्यामुळे वरुण संगीताशी संपर्क करू शकत नव्हता. 
मात्र, संधी मिळताच त्याने संगीताशी संपर्क केला आणि बेपत्ता शर्मा कुटुंबाचे गूढ उकलल 

Tags : Mumbai Police, Missing Case, Sharma Family, Facebook, Virar, 


  •