Mon, Jul 13, 2020 11:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा!  

४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा!  

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:59AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची सोमवारी तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. सुटका होताच आपल्या राजकारणाचा 40 वर्षांपूर्वी श्रीगणेशा केलेल्या भायखळा येथील मंडईच्या प्रांगणात ते सुटकेनंतरचे पहिले भाषण करणार आहेत. 

राष्ट्रवादीचे नेते भुजबळ सोमवारी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी भायखळा भाजी मंडई येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष  सचिन अहिर यांनी दिली.

सोमवारी मेळाव्यानंतर संध्याकाळी ते राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते घरी जातील. मंगळवारी घरी आराम केल्यानंतर बुधवारी लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर एक छोटी  शस्त्रक्रिया करण्यात असून त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पक्षाच्या कामात सक्रिय होतील, अशी माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली.

सोमवारी दुपारपर्यंत त्यांना केईएम हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असून याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला. सध्या केईएम हॉस्पिटलच्या नवीन इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील 47 रूममध्ये भुजबळ उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण अजून काही वैद्यकीय चाचणी व उपचार करायचे असल्यामुळे त्यांना काहीकाळ केईएम हॉस्पिटलमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे समजते. पण भुजबळ कुटुंबीयांनी याला नकार दिला असून पुढील उपचार लिलावती हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.