Wed, Jul 08, 2020 00:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतीयांची ‘ऐपत’ वाढली

भारतीयांची ‘ऐपत’ वाढली

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 2:16AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

नोटबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग आणि रोजगार क्षेत्रावर विपरीत परिणाम झाल्याची टीका होत असली तरी परिस्थिती नेमकी उलट असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत भारतीयांनी अ‍ॅडव्हान्स इन्कम टॅक्सपोटी भरलेली रक्‍कम गेल्यावर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 44 टक्क्यांनी अधिक आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 

केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्राप्‍तिकराच्या बाबतीत सलग दुसर्‍या वर्षी 40 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. कॉर्पोरेट कराच्या बाबतीत ही वाढ गेल्यावर्षीच्या तिमाहीच्या 8 टक्क्याच्या तुलनेत दुप्पट आहे. बँकिंग क्षेत्रात मरगळ आलेली असतानाही कर भरण्यात झालेली वाढ सरकारसाठी दिलासादायक बाब आहे. अ‍ॅडव्हान्स इन्कम टॅक्स भरण्यात झालेली वाढ ही करदात्यांची संख्या वाढल्याचे निदर्शक आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी यासंबंधीचा ब्लॉग प्रसिद्ध केला. अधिक लोक कराच्या जाळ्यात आल्यामुळे ही वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  

कॉर्पोरेट टॅक्स भरण्यात झालेली वाढ ही कंपन्यांकडून उत्पादित उत्पादनांच्या विक्रीवृद्धीकडे निर्देश करते.भारतीय लोक अधिक खर्च करीत असून, वस्तू आणि सेवांचा अधिक उपभोग घेत आहेत, असाच या आकडेवारीचा अर्थ आहे. अर्थात ज्या व्यक्‍तींनी अ‍ॅडव्हान्स टॅक्सदाखल भरलेली रक्‍कम त्यांना लागू होणार्‍या कराच्या तुलनेत अधिक असेल तर प्राप्‍तिकर खात्याला त्याचा परतावा द्यावा लागणार आहे. त्यामुळे या आकडेवारीत काहीसा फरक पडण्याचीही शक्यता आहे. करदात्याला प्राप्‍तिकराचा परतावा पहिल्या तिमाहीत अदा केला जातो. तो अदा केल्यानंतर प्राप्‍तिकरातून संकलित झालेली निव्वळ रक्‍कम कमी होईल. मात्र आगामी तीन तिमाहीत करदात्यांचा कल असाच राहिला तर प्रत्यक्ष कर संकलनात भरीव वाढ झाल्याचे दिसून येईल, असेही जेटली म्हणतात.