होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठीसाठी लढणारे लढवय्ये अ‍ॅड. शांताराम दातार कालवश

मराठीसाठी लढणारे लढवय्ये अ‍ॅड. शांताराम दातार कालवश

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:14AMडोंबिवली : वार्ताहर

मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि कल्याणच्या आधारवाडी-वाडेघर डम्पिंग ग्राऊंडच्या विरोधात आयुष्यभर न्यायालयीन लढा देणारे जागरूक कल्याणकर अ‍ॅड. शांताराम दातार यांचे शनिवारी सकाळी वार्धक्याने निधन झाले. लालचौकी स्मशानभूमीत दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अ‍ॅड. दातार यांच्या पाश्चात्य पत्नी विजया (70), मुलगा अ‍ॅड. अमित, अमेरिका स्थित दुसरा मुलगा आशिष आणि मुलगी वैशाली वैश्यांपायन, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विशेष म्हणजे शनिवारीच 76 वर्ष पूर्ण करून त्यांनी 77 व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांचा वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच सकाळी साडेसात च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 

अ‍ॅड. दातार हे मूळचे इंदूरचे होते. इंदूर येथेच 9 जून 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. निरनिराळ्या ठिकाणी छोट्या-मोठ्या नोकर्‍या करून पुढे एल. एल. बी. पर्यंतचे शिक्षण इंदूर येथेच घेतले. मुंबई परिसरात वकिली व्यवसाय करावयाचा या हेतूने 1968 साली दातार कल्याणला बहिणीकडे आले आणि कल्याणचे रहिवासी होऊन इथल्या समाजजीवनाशी एकरूप झाले. 

वकिली व्यवसायास सुरुवात केल्यानंतर त्यांनी 1970 मध्ये भारतीय मजदूर संघाच्या व 1972 पासून जनसंघाच्या कामास सुरुवात केली. 1974 मध्ये ते भारतीय जनसंघाचे कल्याण शाखेचे उपाध्यक्ष झाले. जून 1975 मध्ये देशात आणीबाणी घोषित झाली. वकिली व्यवसायात नाव होत असताना व घरात पत्नी व तीन लहान मुले असे कुटुंब अवलंबून असतानाही आणीबाणी विरुद्धच्या लढ्यात दातार सहभागी झाले. आणीबाणीविरुद्ध पत्रके वाटली आणि कारावासही भोगला. अनेक बँकांचे व संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम पाहात. परक्या ठिकाणी वकिली व्यवसायात कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांची पूर्ण जाणीव ठेवून नवोदित वकिलांना ते नेहमीच मदतीचा हात देत असत.