Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिलिंद एकबोटेंना शरद पवारांचे संरक्षण : प्रकाश आंबेडकर

मिलिंद एकबोटेंना शरद पवारांचे संरक्षण : प्रकाश आंबेडकर

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी 

पुण्यात 2001 मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी भीमा- कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे यांना काँग्रेस आघाडी सरकारने मोक्का लावण्याचा निर्णय घेतलाहोता. मात्र, तत्कालिन गृहमंत्र्यांना सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई थांबविली होती, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, पवार हे जातीयवादी आहेत. ते जातीयवादी शक्तींना नेहमी मदत करतात. काही राजकीय नेते हिंदू-मुस्लिम दंगली घडवून आणण्यासाठी अनियंत्रित हिंदू संघटनांचा वापर करत आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक विरोधी भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांसोबत आपल्याला संबंध ठेवता येणार नाहीत.  इतरांवर जातीयवादी असल्याचा आरोप करणार्‍या पवारांनी एकबोटे यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही आघाडी करणार नाही.  तसेच पवारांनी आता आपल्याला अधिक बोलण्यास भाग पाडू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

भीमा-कोरेगाव प्रकरणी उच्च न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तरीही त्यांना कधी अटक करणार हे सरकार सांगत नाही. एकबोटेंच्या संघटनेची शक्ती वाढल्याने सरकार अटक करण्यास टाळाटाळ करत आहे. एकबोटेंना अटक होणार नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

आपली भूमिका भाजपला मदत करणारी असल्याची टीका विरोधक करतात, त्यावर ते म्हणाले, आमचा पक्ष भाजपसोबत कधीही जाणार नाही.  मात्र, राष्ट्रवादी वगळता इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत जाण्याबाबतचा निर्णय कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर घेतला जाईल.

पुढील निवडणुकांमध्ये भीमा-कोरेगाव प्रकरणाचा मुद्दा निवडणूक प्रचारात राहील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विश्‍व हिंदू परिषद व हिंदू महासभेसोबत काय संबंध आहेत, ते त्यांनी जाहीर करावे. त्यानंतरच त्यांनी आमच्याशी संवाद साधावा, असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी स्पष्ट केले.