Mon, Aug 19, 2019 15:37



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदित्य ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील : राऊत 

आदित्य ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील : राऊत 

Published On: Jun 12 2019 6:30PM | Last Updated: Jun 12 2019 7:00PM




मुंबई : विशेष प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री पद हे आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, प्रतिष्ठा मिळवली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे पाच वर्षं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 
त्यामुळे आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवतील या चर्चा आता खर्‍या ठरताना दिसत आहेत. ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीच निवडणूक लढवलेली नाही. पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली होती. आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे यांनी याआधीच दर्शवली आहे.

युवासेनेच्या पदाधिकार्‍यांची एक महत्त्वाची बैठक शिवसेना भवन येथे सोमवारी पार पडली. आदित्य ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी शिवसेना-भाजपमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे ट्विट युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी केले होते. जे नेते या वाटाघाटीला हजर नव्हते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचं काम करू नये, असा टोलाही त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन दावे आता सुरु झाले आहेत.

उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सुरू आहेत. असे मत शिवसेनेचे प्रवक्‍ते संजय राऊत यांनी व्यक्‍त केले आहे.