Tue, Jan 21, 2020 10:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदित्य ठाकरेंकडे उपमुख्यमंत्रिपद?

आदित्य ठाकरेंकडे उपमुख्यमंत्रिपद?

Published On: Jul 19 2019 2:28AM | Last Updated: Jul 19 2019 2:28AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

भाजप-शिवसेनेची युती झाल्यास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचे युतीच्या चर्चेत ठरले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी गुरुवारपासून सुरू केलेली राज्यव्यापी जनआशीर्वाद यात्रा ही या मोहिमेचाच भाग असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी बुधवारी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आमचं ठरलंय’ असे सांगून भाजपबरोबर युती निश्चित झाल्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती होणार असल्याचे सांगत प्रचाराची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, युतीत नेमका कोणता फॉर्म्युला ठरलाय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा,  उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित बैठक होऊन लोकसभा आणि विधानसभेसाठी युती जाहीर करण्यात आली. युतीत झालेल्या चर्चेनुसार ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, असे ठरले आहे. 2014 मध्ये भाजपचे 122 आणि शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले होते. ही आकडेवारी पाहता 2019 मध्येही भाजपच्या जादा जागा निवडून येतील. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल. मात्र, अशावेळी आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्याला भाजपने सहमती दिल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

यापूर्वी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेनेने अचानकपणे आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आणले आहे. विशेषत:, शिवसेना नेते खा. संजय राऊत त्यासाठी आघाडीवर आहेत. अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जाऊ लागले आहे,याकडेही भाजपच्या गोटातून लक्ष वेधण्यात येत आहे.