होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शिवसेना फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात पोहचवायची आहे’

शिवसेना देशात पोहचवायची आहे : आदित्य ठाकरे

Published On: Jun 19 2018 12:50PM | Last Updated: Jun 19 2018 12:50PMमुंबई : प्रतिनिधी

निवडणुका कधीही लागू शकतात त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, नुसती मतं नाही तर लोकांची मनं जिंका. आपल्याला शिवसेना नुसती महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर न्यायची आहे. त्याच्या तयारीला लागा, असे आवाहन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी येथून पुढे स्वबळावरच लढणार आणि जिंकणारही, असा नारा दिला.

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी शिबिराचे उदघाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना नेते मनोहर जोशी,   उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे वय दिवसेंदिवस वाढत जात आहे, आपलंही वय वाढतंय. वय वाढत गेलं तरी मनाने थकून जाऊ नका. शिवसेना जन्माला आली नसती तर आज आपण कुठे असतो याचा विचार करा. आज आपण पुर्णपणे सत्तेत नसलो तरी सत्तेत राहून देश व राष्ट्र हितासाठी सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम करत आहोत. शिवसेना स्वतःच्या मेहनतीवर इथपर्यंत आली हे विसरू नका, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला आपण सर्वांनी स्वबळाचा ठराव मंजूर केला आहे. आतापर्यंत आपण स्वतःची ताकद कधीच बघितली नव्हती, पण आता तसं चालणार नाही. स्वबळावर लढायचं आणि आपल्याला जिंकायचं हे लक्षात ठेवा. पालघर लोकसभा निवडणुकीपासून त्याची सुरुवात झाली असून साम, दाम, दंड वापरून कागदावर ही निवडणूक कोणीही जिंकलं असलं तरी नैतिक विजय हा शिवसेनेचाच झाला आहे. त्यासोबतच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन जागा स्वबळावर निवडून आल्या. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा युवासेनेने जिंकल्या, यावरून आपण ठरवले तर काही करू शकतो हे शिवसेनेने दाखवून दिले. २५ जूनला होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत चारही जागा जिंकायच्याच या इर्षेने कामाला लागा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.