Thu, Jun 27, 2019 12:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपला पालघरवासीय जागा दाखवतील

भाजपला पालघरवासीय जागा दाखवतील

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 1:53AMमोखाडा : वार्ताहर 

आमचा मित्र पक्ष भाजपची सत्तेत आल्यानंतर मस्ती वाढली. यामुळेच मित्र पक्षांना सोडाच, ते दिवगंत खासदार चिंतामण वनगांच्या कुटुबियांनाही विसरले. त्यामुळे अशा मस्तवाल भाजपला पालघरवासीय आपली जागा दाखवतील, असा विश्‍वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मोखाड्यात व्यक्त केला. ते शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी मोखाड्यात काढलेल्या रॅलीत बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अन्य कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख टाळत केवळ भाजप वर टीका केली. 

यावेळी श्रीनिवास वनगा म्हणाले, भाजपवाल्यांनी माझे बाबा गेल्यानंतर आम्हाला वार्‍यावर सोडले. मात्र, मातोश्रीने आम्हाला प्रेम दिले. मी उमेदवारी मागतच नव्हतो. मात्र, भाजपवाल्यांना माझ्या बाबांचे काम पुढे न्यायचे नव्हते. त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, शिवसेनेने ती संधी मला दिली असून, तुम्ही मला आशीर्वाद द्या, असे आवाहन वनगा यांनी केले.

यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शांताराम मोरे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, तालुका प्रमुख अमोल पाटील आदी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.